वृद्ध असल्यामुळे शिक्षा कमी केली जाऊ शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:08 AM2019-07-24T03:08:04+5:302019-07-24T03:08:23+5:30
हायकोर्टाचा निर्णय; निंदनीय गुन्ह्यामुळे दया नाही
राकेश घानोडे
नागपूर : निंदनीय गुन्हा करणारे गुन्हेगार केवळ वयोवृद्ध आहेत, म्हणून शिक्षेत सूट दिली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका प्रकरणात दिला.
सुनेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे अकोला येथील सासू-सासरे कौसल्या खेर्डेकर (७३) व श्यामराव खेर्डेकर (७८) हे वृद्ध आहेत. त्यामुळे त्यांची शिक्षा कमी करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. न्यायालयाने ती विनंती फेटाळली. ते दोघे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असल्याच्या कारणास्तव त्यांची शिक्षा कमी केली जाऊ शकत नाही. त्यांनी नवविवाहितेचा मानसिक छळ करण्याचे निंदनीय कृत्य केले आहे. असह्य छळामुळे नवविवाहितेला आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे दोघांवर दया दाखवता येणार नाही असे न्यायालयाने नमूद केले.
सुनेचा शारीरिक छळ केला नाही असा दावाही न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने तो दावा खोडून काढला. आत्महत्येचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक वेळी शारीरिक छळच आवश्यक नसतो. मानसिक छळ हा शारीरिक छळापेक्षा अधिक त्रासदायक असतो. त्यातूनसुद्धा व्यक्ती जीवन संपविण्याचा निर्णय घेऊ शकते.
या प्रकरणातील मयत मुलगी सासरी गेली, तेव्हा तिचा पती मानसिक आजारी असल्याचे कळले. या धक्क्यातून सावरत असतानाच तिच्यावर गर्भधारणेसाठी सासऱ्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी तिचा मानसिक छळ केला, मारहाण केली. उपाशी ठेवण्यात आले. हे कृत्य आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत ठरणारे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सत्र न्यायालयाने ९ नोव्हेंबर २००६ रोजी दोघांना पाच वर्षे सश्रम कारावास व १०० रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. ते अपील फेटाळण्यात आले. मयत महिलेचे १२ मे २००५ रोजी रामेश्वर याच्याशी लग्न लावण्यात आले. मात्र तिने ६ आॅक्टोबर २००५ रोजी आत्महत्या केली.