क्षयरुग्णांची नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:02 PM2019-05-30T22:02:42+5:302019-05-30T22:03:43+5:30

क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशामध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस् प्लॅन सन २०१५ ते २०१७ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टिकोनातून १६ मार्च २०१८ ची अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक रुग्णालयाने क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयामार्फत रुग्णांच्या नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. तसे न केल्यास रुग्णालयांना शिक्षेची तरतूदही आहे.

Punishment to hospitals not registering tuberculosis | क्षयरुग्णांची नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना शिक्षा

क्षयरुग्णांची नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना शिक्षा

Next
ठळक मुद्देक्षयरुग्णांची नोंदणी करण्याचे आवाहन : निक्षय अ‍ॅपचा वापर करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशामध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस् प्लॅन सन २०१५ ते २०१७ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टिकोनातून १६ मार्च २०१८ ची अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक रुग्णालयाने क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयामार्फत रुग्णांच्या नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. तसे न केल्यास रुग्णालयांना शिक्षेची तरतूदही आहे.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम २००३ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर, एक्सडीआर रोगनिदानाच्या अद्यावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोईसुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच निक्षय पोषण योजनेंतर्गत रुग्णांचा उपचार पूर्ण होईपर्यंत ५०० रुपये पोषण आहारासाठी आर्थिक मदत रुग्णांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु बऱ्याच रुग्णांची नोंद झाली नसल्याने दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू होतो. तसेच बहुतेक रुग्ण क्षयरोगाच्या निदानापासून तसेच औषधोपचार यापासून वंचित राहतात. या रुग्णांची नोंदणी प्रक्रिया सोपी व्हावी, याकरिता केंद्र सरकारने निक्षय नावाच्या अ‍ॅपची निर्मिती केलेली आहे. रुग्णांची नोंद करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकास ५०० रुपये मानधन, रुग्णांचा उपचार पूर्ण करून घेतल्यास पुन्हा ५०० रुपये मानधन, रुग्णांचे उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उपचार सहायकास ड्रग सेन्सिटिव्ह रुग्णांना १००० रुपये, एमडीआर रुग्णामागे ५००० रुपये, रुग्णांना आवश्यक तपासणीसाठी ५०० रुपये मानधन, अशा विविध सुविधा देण्यात येत आहेत.
क्षयरुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता त्यांच्यावर योग्य औषधोपचार व्हावेत व तो बरा व्हावा, या उद्देशाने रुग्णांची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग केंद्राच्या मार्फत सर्व सार्वजनिक, खासगी रुग्णालय व वैद्यकीय व्यावसायिकांना केले आहे. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५च्या) कलम २६९ आणि २७० च्या अंतर्गत शिक्षा करण्यात येईल. तरी सर्व सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालय, सर्व औषध निर्माते, अशासकीय संस्थांमार्फत चालविली जाणारी रुग्णालये व दवाखाने यांनी त्यांच्याकडे निदान झालेले तसेच उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असून, त्या क्षयरुग्णांची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे.
असा आहे निक्षय अ‍ॅप
देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील क्षयरुग्णांची माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळविता येईल. ज्या रुग्णांची नोंदणी झाली त्यांना एक युनिक आयडी देण्यात येतो. याअंतर्गत प्रत्येक रुग्णाच्या उपचाराची स्थिती तसेच बँकेच्या खात्याची माहिती संग्रहित असते. याद्वारे रुग्णांना कोणत्याही क्षयरोग केंद्रात उपचार करून घेता येतो. या अ‍ॅपला रुग्णांच्या बँक खात्याला जोडलेले आहे. तसेच रुग्णांना पोषण आहारासाठी जी आर्थिक मदत दिल्या जाते, त्याची स्थिती पाहता येणार आहे. ती आर्थिक मदत वेळेवर न मिळाल्यास या अ‍ॅपवर तक्रार करता येते. अशा सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Punishment to hospitals not registering tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.