उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:42+5:302021-02-26T04:11:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शहरी व ग्रामीण नागरिकांनी शासनाने जारी केलेल्या काेराेना प्रतिबंधात्मक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शहरी व ग्रामीण नागरिकांनी शासनाने जारी केलेल्या काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करावे. या उपाययाेजनांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती कळमेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये २२ फेब्रुवारी ते ७ मार्च या काळात काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांची काटेकाेर अंमलबजावणी करावयाची आहे. या काळात कळमेश्वर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, इतर तत्सम संस्था तसेच सर्व शिकवणी वर्ग बंद ठेवण्यात आले असून, केवळ ऑनलाईन कामकाज परवानगी देण्यात आली आहे. शहरातील वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे विक्री, पेट्रोलपंप व इतर अत्यावश्यक सेवा वगळून इतर बाजारपेठा व दुकाने या काळात दर शनिवारी व रविवारी बंद राहील. जीवनावश्यक वस्तू वगळता शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली आहे.
सर्व मंगल कार्यालय, सभागृह, हॉटेल यासारख्या ठिकाणी लग्नसमारंभाच्या आयोजनास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सभा, सामाजिक व सांस्कृतिक व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रम आयोजनास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
रेस्टॉरंट, हॉटेल, बीअर बार जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश कायम राहतील. शासनाद्वारे ‘मिशन बिगीन अगेन’च्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय दंड संहिताचे कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही स्मिता काळे यांनी सांगितले.
ही कारवाई व काेराेना संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा नियमित वापर करावा. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले आहे.