शिक्षक संवर्गाच्या वेतनास पूरणचंद्र मेश्राम अपात्र
By Admin | Published: July 21, 2016 02:06 AM2016-07-21T02:06:17+5:302016-07-21T02:06:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांची संपूर्ण सेवा शिक्षकेतर संवर्गातील असल्यामुळे ...
हायकोर्टात शासनाचे प्रतिज्ञापत्र : याचिका फेटाळण्याची विनंती
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांची संपूर्ण सेवा शिक्षकेतर संवर्गातील असल्यामुळे त्यांना शिक्षक संवर्गाचे वेतन दिले जाऊ शकत नाही, असे उत्तर राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले आहे.
शासनातर्फे उच्च शिक्षण विभागाच्या नागपूर विभागीय सह-संचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ३१ जानेवारी २०१५ रोजी कुलसचिवांचे पद भरण्यासाठी जाहिरात दिली होती. हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. या जाहिरातीत शिक्षक संवर्गातील उमेदवारांकरिता ३७,४००-६७,००० रुपये वेतन श्रेणी व १०,००० रुपये ग्रेड पे तर, शिक्षकेतर संवर्गातील उमेदवारांकरिता ३७,४००-६७,००० रुपये वेतन श्रेणी व ८,९०० रुपये ग्रेड पे नमूद करण्यात आले होते. मेश्राम यांनी शिक्षकेतर संवर्गातून अर्ज सादर केला होता. त्यावेळी त्यांनी वेतनावर आक्षेप घेतला नव्हता. नियमानुसार त्यांना शिक्षक संवर्गाचे वेतन लागू केले जाऊ शकत नाही, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. तसेच, मेश्राम यांची रिट याचिका खारीज करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने शासनाच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी एक आठवड्यानंतर सुनावणी निश्चित केली. वित्त व लेखाधिकारी पदाकरिता ३० मे २०१४ पासून तर, कुलसचिव पदाकरिता २५ मे २०१५ पासून ३७,४००-६७,००० रुपये वेतन श्रेणी व १०,००० रुपये ग्रेड पे आणि १२ आॅगस्ट २००९ रोजीच्या ‘जीआर’अनुसार लाभ देण्याची मेश्राम यांची मागणी आहे.
तसेच, त्यांनी ३० मे २०१४ पासून वेतनातील फरक अदा करण्याची विनंतीही याचिकेत केली आहे. मेश्राम यांच्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)