१५९ शेतकऱ्यांकडून ४,०३० क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:09 AM2020-12-08T04:09:05+5:302020-12-08T04:09:05+5:30
सावनेर : राज्य शासनाच्या कापूस पणन महासंघाने सावनेर शहरात खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर आजवर १५९ शेतकऱ्यांकडून ...
सावनेर : राज्य शासनाच्या कापूस पणन महासंघाने सावनेर शहरात खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर आजवर १५९ शेतकऱ्यांकडून ४,०३० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. या केंद्रावर परिसरातील सात तालुक्यांमधील शेतकरी कापूस विकायला आणत आहेत.
पणन महासंघाच्या सावनेर येथील खरेदी केंद्राला २७ नाेव्हेंबर राेजी सुरुवात करण्यात आली असून, या केंद्रावर पहिल्या दिवशी प्रतिक्विंटल ५,७७५ रुपये दराने कापूस खरेदी करण्यात आली. सध्या या केंद्रावर प्रतिक्विंटल ५,७२५ रुपये दराने खरेदी केली जात आहे. या केंद्रावर साेमवार (दि. ७)पर्यंत १५९ शेतकऱ्यांकडील ४,०३० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात सीसीआय, पणन महासंघाचे इतर ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने सावनेर येथील केंद्रावर हिंगणा, नागपूर (ग्रामीण), माैदा, उमरेड, रामटेक, पारशिवनी व सावनेर तालुक्यातील शेतकरी कापूस विकायला आणत आहेत. त्यामुळे या खरेदी केंद्रावर कापसाची आवक हळूहळू वाढत आहे.
तालुक्यात कापसाची खेडा खरेदी सुरू असून, जिनिंगमध्येही कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. जिनिंगमध्ये कापसाला प्रतिक्विंटल ५,३०० रुपये भाव मिळत असून, खेडा खरेदीचे दर त्याहीपेक्षा कमी आहेत. यावर्षी रेंगाळलेला परतीचा पाऊस आणि गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे कापसाचा उत्पादनखर्च वाढला असून, उत्पादनात घट आली आहे. तुलनेत कापसाला मिळणारा भाव कमी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
---
चार शासकीय खरेदी केंद्र
नागपूर जिल्ह्यात चार कापूस खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सीसीआयच्या नरखेड व कळमेश्वर आणि पणन महासंघाच्या सावनेर व काटाेल या खरेदी केंद्राचा समावेश आहे. पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस खरेदीला आणते वेळी शेतकऱ्यांना साेबत सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक याच्या झेराॅक्स प्रती आणणे आवश्यक आहे.