एलपीजी सिलिंडर घेण्यापूर्वी वजन करा, व्हॉल्वची गळती तपासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:06 AM2019-11-23T00:06:33+5:302019-11-23T00:07:45+5:30
ग्राहकांचे संरक्षण आणि सेवांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी इंडियन ऑईलने चॅनल भागधारकांसह इंडेन एलपीजी ग्राहकांना जागरूक करण्यासाठी एका देशव्यापी अभियानाची सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकांचे संरक्षण आणि सेवांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी इंडियन ऑईलने चॅनल भागधारकांसह इंडेन एलपीजी ग्राहकांना जागरूक करण्यासाठी एका देशव्यापी अभियानाची सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत नागपुरात जागरूकता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक (महाराष्ट्र व गोवा) मुरली श्रीनिवासन म्हणाले, घरगुती सिलिंडर घरी आणल्यानंतर ग्राहकांनी एलपीजी सिलिंडरचे वजन, ओ-रिंग आणि व्हॉल्वमधील गळतीची तपासणी डिलेव्हरी बॉयकडून करून घ्यावी. या तपासण्या डिलेव्हरी बॉयला ग्राहकांना सिलिंडरचे हस्तांतरण करताना करायच्या आहेत. अभियानाचा उद्देश ग्राहकांना वितरण कर्मचाऱ्यांकडून सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याविषयी जागरुक करण्याचा आहे.
इंडियन ऑईलच्या सर्व एलपीजी बॉटलिंग प्रकल्पात सिलिंडर तपासणी, गुणवत्ता आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे. नोव्हेंबर महिन्यात प्री-डिलिव्हरीचे जागरूकता अभियान इंडियन ऑईल कंपनीच्या व्यावसायिक मूल्यांना लक्षात घेऊन ग्राहकांच्या हितासाठी सुरू केले आहे. ग्राहकांना सिलिंडर हस्तांतरित करण्यापूर्वी त्याची परिपूर्ण तपासणी हा इंडेन सिलिंडर डिलिव्हरी यंत्रणेचा भाग राहिला आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वापरकर्त्यांना एलपीजीचा सुरक्षित वापर करण्याविषयी जागरूकता करण्याची जबाबदारी वाढली आहे. विदर्भात योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ४.१२ लाख आहे. कंपनीच्या नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत महिन्याकाठी विदर्भात ७.५० लाख इंडेन सिलिंडरचे हस्तांतरण केले जाते. त्या अंतर्गत कंपनीने १५० पेक्षा जास्त वितरक, ७१५ डिलिव्हरी बॉय आणि १५.३९ लाख भारतीय ग्राहकांच्या आपल्या नेटवर्कपर्यंत पोहोचून महाराष्ट्रातील जागरुकता अभियानाची सुरुवात केल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.
या प्रसंगी इंडियन ऑईलचे मुख्य महाव्यवस्थापक (एलपीजी, महाराष्ट्र व गोवा) तापस गुप्ता, उपमहाव्यवस्थापक (पश्चिम विभाग) अंजली भावे, नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक (आयबी) सी.एम. घोडपागे, मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक अनिल मेहेर, उपमहाव्यवस्थापक (रिटेल सेल) नितीन रोडगे, व्यवस्थापक दीपक कुंभारे आणि इंडेनचे डीलर उपस्थित होते.
२०२१ पर्यंत बॉटलिंग प्रकल्प सुरू होणार
इंडियन ऑईलचा बॉटलिंग प्रकल्प नवीन बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ४१ एकरात १३० कोटींच्या गुंतवणुकीतून २०२०-२१ पर्यंत सुरू होणार असल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.
ग्राहकांचे हक्क
- इलेक्ट्रॉनिक वजन मशीनवर सिलिंडरचे वजन करून द्यावे.
- ओ-रिगमधून गॅस गळतीची तपासणी करावी.
- व्हॉल्वमधील गळती तपासणी पाहावी.
- डिलेव्हरी बॉयचे ओळखपत्र तपासावे.
- १९०६ क्रमांकावर तक्रार नोंदवावी.
- नेट बँकिंगने शुल्क भरावे.