‘वज्रमूठ’ तापलेलीच, 'मविआ'च्या सभेनंतर भाजपकडून मैदानावर गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण
By योगेश पांडे | Published: April 17, 2023 06:11 PM2023-04-17T18:11:41+5:302023-04-17T18:15:49+5:30
पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यावरून चांगलाच वाद पेटला होता
नागपूर :महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली असली तरी वाद मात्र कायमच आहे. सभेच्या आयोजनाच्या अगोदरपासून स्थानिकांचा सुरू असलेला विरोध सभा झाल्यावरदेखील कायम होता. या सभेच्या आयोजनाचा निषेध करण्यासाठी सद्भावना नगर- दर्शन कॉलनी मैदान बचाव कृती समिती व भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मैदानाची साफसफाई करण्यात आली. तसेच मैदानावर गोमूत्र शिंपडत मंत्रपठण करत शुद्धीकरण करण्यात आले.
पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यावरून चांगलाच वाद पेटला होता. हे प्रकरण न्यायालयातदेखील गेले. दरम्यान रविवारी महाविकासआघाडीच सभा झाली. त्यानंतर सोमवारी आयोजकांकडून सभेतील खुर्च्या व इतर सामान हटविण्याचे काम सुरू होते.
दुपारच्या सुमारास मैदान बचाव कृती समितीच्या नागरिक व भाजपचे कार्यकर्ते एकत्रित आले. त्यांनी अगोदर मैदानाची साफसफाई केली व त्यानंतर मैदानात गोमूत्र शिंपडून मविआच्या नेत्यांचा निषेध केला. यावेळी महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. मैदानावर जागोजागी अस्वच्छता करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी चक्क पंडितांनादेखील बोलविण्यात आले होते व गंगाजल-गोमूत्राने शुद्धीकरण करण्यात आले