मनाची शुद्धताच जीवन जगण्याचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:14 AM2017-10-21T01:14:47+5:302017-10-21T01:15:06+5:30
भगवान बुद्धांचा धम्म हा जीवन जगण्याची पद्धती आहे. भगवान बुद्धांनी मानवाच्या दुख: मुक्तीसाठी पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि १० पारमितेची शिकवण दिली,...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवान बुद्धांचा धम्म हा जीवन जगण्याची पद्धती आहे. भगवान बुद्धांनी मानवाच्या दुख: मुक्तीसाठी पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि १० पारमितेची शिकवण दिली, बुद्धांनी मानवीय मनाचे सखोल अध्ययन केले होते, ज्या व्यक्तीचे मन शुद्ध, त्याचे आचरण शुद्ध, त्याचा व्यवहार शुद्ध, त्याचे आरोग्य शुद्ध, अशी व्यक्ती नेहमी ऐहिक आणि सुखी जीवन जगते, आपले मन शुद्ध ठेवा, तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन इंटरनॅशनल महाबोधी मेडिटेशन सेंटरचे भदंत संघसेना यांनी व्यक्त केले.
उत्तर नागपुरातील बुद्धनगर स्थित बुद्धा पार्क येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भदंत वन्नासामी (म्यानमार), भदंत विनायरक्खिता (बेंगळुरू), भदंत प्रा.खेमधम्मो, भदंत शुभ्रसागर (प. बंगाल), भदंत चंद्रकीर्ती, भदंत मेत्तानंद, भिक्षुणी थुलनंदा, भदंत अनिरुद्ध, भदंत नागप्रकाश, आवाज इंडियाचे संचालक अमन कांबळे, प्रितम बुलकुंडे, राजीव झोडापे, पी. एस. खोब्रागडे उपस्थित होते.
भदंत संघसेना म्हणाले, लोकांनी वर्तमानामध्ये जगणे शिकले पाहिजे, आपले जीवन अमूल्य आहे. स्वर्ग, नरक या संकल्पना कल्पनाविलास मात्र आहे, त्याचा विचार करू नका, तुम्ही या जीवनात जे काही कुशल कर्म करू शकता, लोकांच्या भल्याचे कार्य करू शकता ते करा, तुम्ही नियमित आनंदित व्हाल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवस चाललेल्या या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कार्यक्रम पार पडले. ५ ते १६ वयोगटातील बालकांनी धम्मपदाच्या गाथा अर्थासहित सादर केल्या. मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक सादर केले. तबलावादन, गायन, दांडपट्टा, लेझिमचे सादरीकरण केले.
शुक्रवारी सकाळी ६ वाजता विजया-विनया जाधव यांनी धम्मपहाट सादर केले. सायंकाळी संजीवनी सखी मंच ने नृत्यनाटिका सादर केली. यावेळी इंजीनियर विजय मेश्राम, नगरसेवक मनोज सांगोले, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, जनार्दन मून, सुधीर भगत यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. प्रास्ताविक अमन कांबळे यांनी केले.