शिक्षकांना मतदानासाठी जांभळ्या रंगाचा पेन
By Admin | Published: January 24, 2017 02:54 AM2017-01-24T02:54:33+5:302017-01-24T02:54:33+5:30
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ६ फेब्रुवारीला
विभागीय आयुक्त : इतर पेनचा वापर केल्यास मतदान अवैध
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या वेळी मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. तसेच मतदारांना मतदानासाठी प्रशासनाकडून जांभळ्या रंगाचा शाईचा विशेष पेन पुरविण्यात येणार आहे. मतदान नोंदणीसाठी या विशेष पेनाचा उपयोग करायचा आहे. इतर पेनचा उपयोग केल्यास मतदान अवैध ठरणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
अनुप कुमार यांनी सांगितले, नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. मतदानासाठी १२४ केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यासाठी ६८० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार म्हणून ३४ हजार ९८७ शिक्षकांची नोंदणी झाली आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून पुरविण्यात येणारा विशेष पेन त्यांच्याकडून परत घेण्याकरिता एका मतदान अधिकाऱ्याची नेमणूक सुद्धा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहितेदरम्यान विकास कामे, महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष मोहोड, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपायुक्त पापडकर, तहसीलदार श्रीराम मुंधडा उपस्थित होते.(प्रतिनिधी)
बावनकुळेंचे वक्तव्य आचारसंहितेचा भंग नाही
विधान परिषदेचे आमदार फंड विकतात, असे विधान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच केले होते. त्यांचे हे वक्तव्य आचारसंहिता भंग नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी स्पष्ट केले.
कुर्वे विराधातील तक्रार राजकीय
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे नागपूरचे स्थानिक आहेत. नागपूर महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांची बदली करावी किंवा त्यांच्याकडे कोणताही कार्यभार देऊ नये, अशी तक्रार एका व्यक्तीकडून विभागीय आयुक्तांकडे केली आहे. यावर स्पष्टीकरण देताना विभागीय आयुक्त म्हणाले, ते सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आणि महापालिका निवडणुकीत मनपा आयुक्त हेनिर्णय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या विरोधात केलेली तक्रार ही केवळ राजकीय असल्याचे अनुप कुमार म्हणाले.
सेंट उर्सुला शाळेत होणार मतमोजणी
मतमोजणी सेंट उर्सुला शाळेत होणार आहे. मतदानानंतर सर्व साहित्य या ठिकाणी सुरक्षा कक्षात जमा करण्यात येईल. याच ठिकाणी ६ फेब्रुवारीला मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल.
व्ही.एम. पाटील निवडणूक निरीक्षक
नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व्ही.एम. पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विभागीय आयुक्त अनुप कुमार हे निवडणूक निर्णय अधिकारी राहतील. तर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे (नागपूर) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहतील.
मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पार पडले आहे. आता दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षण होणार आहे. येत्या २८ जानेवारी रोजी मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.