शिक्षणाचा उद्देश केवळ अर्थार्जन नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:08 AM2021-02-26T04:08:07+5:302021-02-26T04:08:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा, त्यांच्या शिक्षण प्रणालीतील भूमिकेचा सखोल विचार झाल्याचे दिसून येते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा, त्यांच्या शिक्षण प्रणालीतील भूमिकेचा सखोल विचार झाल्याचे दिसून येते. अभ्यासक्रमांचे सातत्याने नियमित स्वरूपात अद्ययावतीकरण, शिक्षकांना नवनवीन कौशल्याने अवगत करणे, त्यांना प्रशिक्षण उपलब्ध करवून देणे, या बाबी तर महत्त्वाच्या आहेत. मात्र शिक्षणाचा उद्देश केवळ अर्थार्जन हा नको तर नवीन युगातील आव्हानांचा सामना करू शकणाऱ्या नवीन शिक्षकांची निर्मिती करणे हा देखील आहे. शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आला आहे, असे मत मेरठ येथील चौधरी चरणसिंग विद्यापीठचे कुलगुरू प्रा. नरेंद्र तनेजा यांनी व्यक्त केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभाग आणि विद्याभारती उच्च शिक्षण संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयावरील ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्रा. विजयकुमार उपस्थित होते. अभ्यासक्रम तयार करण्याचे दायित्व हे राज्य सरकार आणि त्याअंतर्गत चालणाऱ्या विद्यापीठांवर आहे. विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागांनी पुढाकार घेऊन, अत्यंत सक्रियपणे विद्यार्थीकेंद्रित, नवननिर्मितीक्षम, आंतरविद्याशाखीय, सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार करावे, असे आवाहन प्रा. तनेजा यांनी केले. ज्ञान, कौशल्य आणि संस्कार विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करणे, हेच शिक्षणाचे ध्येय आहे. त्यासाठी गुरू आणि शिष्य यांचा सरळ संबंध येणे आवश्यक आहे. शिक्षकाने ‘गुरू’स्थानी होण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. वरखेडी यांनी केले.
डाॅ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी परिषद आयोजनाची भूमिका मांडली. विभाग प्रमुख डाॅ. कीर्ती सदार यांनी प्रास्ताविक केले तर अधिष्ठाता प्रो. ललिता चंद्रात्रो यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. पल्लवी कावळे यांनी केले तर डाॅ. हृषिकेश दलाई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.