चळवळ राबविताना हेतू शुद्ध असावा!

By admin | Published: April 14, 2015 12:11 AM2015-04-14T00:11:10+5:302015-04-14T00:11:10+5:30

चैत्यभूमी ट्रस्टचे व्यवस्थापक भंते बी. संघपाल यांची ‘लोकमत’शी बातचीत.

The purpose of the movement should be pure! | चळवळ राबविताना हेतू शुद्ध असावा!

चळवळ राबविताना हेतू शुद्ध असावा!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला : धम्म, आंबेडकर चळवळ राबविताना हेतू शुद्ध असणे गरजेचे आहे. कारण क्षणाक्षणाला मन आणि मत परिवर्तन होत आहे. त्यासाठी मनावर विश्‍वास ठेवावा लागणार असून, त्याला नैतिकतेची जोड द्यावी लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्ध धम्मातील लोकांनी असा संकल्प केला, तर धम्मचळवळ गतिमान होण्यास वेळ लागणार नाही, असे विचार चैत्यभूमी ट्रस्टचे व्यवस्थापक भंते बी. संघपाल यांनी मांडले
भंते बी. संघपाल अकोला दौर्‍यावर आहेत. अकोला तालुक्यातील सांगळूद येथे श्रामणेर शिबिराला आले असताना त्यांनी ह्यधम्म चळवळ व डॉ. आंबेडकर जयंतीह्ण या विषयावर खास ह्यलोकमतह्णशी बातचीत केली.

प्रश्न-धम्म चळवळ पुढे नेण्याचे काम भंते तर करीत आहेत?
उत्तर-बरोबर आहे. भंते धम्म चळवळीचे काम करीत आहेत, पण त्याला समाजबांधवांची जोड लागेलच ना, बौद्ध समाज शिकला, प्रगल्भ झाला, पण वर्तमान स्थिती म्हणावी तेवढी समाधानकारक नाही. चळवळ सुरू आहे, त्याला गती नाही. त्यांची अनेक कारणे असली तरी हेतू शुद्ध असला तर मात्र चळवळ थांबत नाही; पण येथेच मत, मन परिवर्तन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

प्रश्न- चळवळ दिशाहीन झाले असे आपणास म्हणायचे का?
उत्तर- असेही काहीसे म्हणता येईल, कारण धम्म, आंबेडकर चळवळीसाठी आंबेडकरी कवी, गायक, पूर्वजांनी रक्त ओतलं आहे. त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता समाज, चळवळीला वाहून घेतले होते, टी.एल. शिशूपाल, संजय पवार, श्रीधर ओव्हळ, गोविंद म्हशीलकर यांनी या चळवळीला गीत, गायनातून मोठे केलं म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे सभांचं काम हे कवी करीत आहेत. गोविंद म्हशीलकर पोटतिडकीने बाबासाहेबांचे विचार, चळवळ गीतातून मांडायचे, तेव्हा खोकताना त्यांच्या घशातूून रक्त पडायचे. समाजाने त्यावेळी रक्त ओतून ही चळवळ निर्माण केली आहे. कारण उद्याची िपढी ही बाबासाहेबांच्या विचारांची घडेल, असा त्यांना विश्‍वास होता. पण आज त्यांच्या रक्ताची किंमत समाज विसरत चालला असून, बाबासाहेबांच्या विचाराचा रथ थांबला की काय, असे वाटायला लागले आहे.

प्रश्न-चळवळ गतिमान करण्यासाठी काय करावे, असे तुम्हाला वाटते?
उत्तर - मन चंचल आहे, त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. त्यासाठी बुद्ध धम्मात पंचशील आहे, बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. यांचे तंतोतंत पालन केल्यास मन भटकत नाही, हेतू ढासळत नाही, त्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. कारण पूर्वजांनी आर्थिक स्थिती बघितली नव्हती. समाज परिवर्तनासाठी त्यांनी स्वत:ला चळवळीत झोकून दिले हो ते, आज ती परिस्थिती नाही आणि रक्त ओकण्याची गरज नाही. बाबासाहेबांच्या पुण्याईने समाजातील अनेक लोक चांगली कमाई करीत आहेत. आर्थिक संपन्न झाले आहेत. पण या पैशाचे नियोजन कशासाठी करावे, हेच त्यांना सुचत नाही. समाजाला वर आणण्यासाठीचे प्रयत्न थिटे पडत आहेत, हेच त्यांचे अज्ञान आहे.

प्रश्न- नेमके काय कारण असावे या मागे?
उत्तर- खरे तर याला आंबेडकरवादी म्हणणारे राजकीय पक्ष तेवढेच जबाबदार आहेत. बाबासाहेबांच्या पुण्याईने पैसा आला, पण त्याचे नियोजन करता येत नसल्याने समाजातील लोक व्यसनाधिनतेकडे वळत आहेत. राजकीय स्वार्थापोटी या व्यसनाधिनतेत गुंतवले जात आहेत. नशा माणसाला सर्व गोष्टी करायला शिकवते, त्यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. म्हणूनच चळवळीला गतिमान करायचे असेल तर मिळणार्‍या पैशापेक्षा स्वाभिमान जपण्याची गरज आहे. समाजहितावर खर्च करावे, समाजातील गरिबांना मदत करावे, होतकरू ंना उद्योग सुरू करू न द्यावे, त्याचा उद्योग सुरू झाल्यास तो समाजाला मदत करण्यास पुढे येईल, पण असे होत नसल्याचे चित्र आहे.

प्रश्न- डॉ. आंबेडकर जयंती कशी साजरी करावी ?
उत्तर- सन १४ एप्रिल १९५१ मध्ये डॉ. बाबासाहेबांचा साठावा वाढदिवस परेळ मुंबई येथील दामोदार हॉलमध्ये साजरा करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले होते. या सभेत बाबासाहेब म्हणाले होते, माझा जयजयकार करण्यापेक्षा मी जे सांगतो ते समाजात रुजवा, माझे विचार डोक्यात घ्या, परिवर्तन करा, निष्ठावान कार्यकर्ते घडवा, पण आज सर्व विपरीत सुरू आहे. डीजे, ढोल ताशे लावून मद्यधुंद अवस्थेत नाचून जयंती साजरी केली जात आहे. लाखो रुपये त्यावर खर्च केले जात आहेत. हे बदलण्याची गरज असून, समाजातील लोकांनी हा धोका वेळीच ओळखण्याची गरज आहे.

प्रश्न- मंबई दादर येथील चैत्यभूमी ट्रस्टचा काही वाद आहे का ?
उत्तर- कोणताही वाद नाही, चैत्यभूमी ट्रस्ट वेगळी आहे. भैयासाहेब आंबेडकरांनी हे स्मारक बांधले आहे. त्यांनी भीमज्योत यात्रा काढली होती. या यात्रेतून गोळा झालेल्या पैशातून हे स्मारक उभे केले आहे. मीराताई आंबेडकर या त्या ट्रस्टच्या सदस्या आहेत.

Web Title: The purpose of the movement should be pure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.