पूर्वशीच्या आत्मविश्वासापुढे सर्व अडथळे नतमस्तक, नेत्रदोषाला हरवून बारावीत मिळविले ६७.८३ टक्के गुण
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 21, 2024 22:54 IST2024-05-21T22:54:05+5:302024-05-21T22:54:32+5:30
Nagpur HSC Result News: प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही म्हण पूर्वशी बागडे या प्रतिभावंत विद्यार्थिनीने खरी करून दाखविली. ७५ टक्के नेत्रदोष असतानाही तिने अथक परिश्रम घेऊन इयत्ता बारावीच्या कला शाखेमध्ये ६७.८३ टक्के गुण मिळविले. तिच्या आत्मविश्वासापुढे सर्व अडथळे नतमस्तक झाले.

पूर्वशीच्या आत्मविश्वासापुढे सर्व अडथळे नतमस्तक, नेत्रदोषाला हरवून बारावीत मिळविले ६७.८३ टक्के गुण
- राकेश घानोडे
नागपूर - प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही म्हण पूर्वशी बागडे या प्रतिभावंत विद्यार्थिनीने खरी करून दाखविली. ७५ टक्के नेत्रदोष असतानाही तिने अथक परिश्रम घेऊन इयत्ता बारावीच्या कला शाखेमध्ये ६७.८३ टक्के गुण मिळविले. तिच्या आत्मविश्वासापुढे सर्व अडथळे नतमस्तक झाले.
पूर्वशी उत्तर अंबाझरी रोडवरील एल. ए. डी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील मुकेश रेल्वेमध्ये लहान मुलांची खेळणी विकण्याचे काम करतात तर, आई माधुरी गृहिणी आहे. पूर्वशी त्यांची एकुलती एक लाडाची लेक आहे. पूर्वशीला लहानपणापासूनच नेत्रदोष आहे. त्यामुळे तिला विशेष काळजीची गरज होती. करिता, आईवडीलांनी तिचे चांगले संगोपन करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. ती स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभी राहावी, यासाठी तिच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. पूर्वशीनेही तिच्या कर्तव्याला न्याय दिला. पूर्वशीला छोटी अक्षरे वाचता येत नाहीत. त्यामुळे तिने ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून बारावीचा अभ्यास केला. ती रोज पाच ते सहा तास अभ्यास करीत होती. दरम्यान, तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, पण ती मागे हटली नाही. तिने सतत पुढची मजल गाठली. पूर्वशीला आता बी. ए. पदवी मिळवून त्यानंतर एमपीएससी परीक्षेची तयारी करायची आहे.