विकास ठाकरे यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:14 AM2017-09-15T01:14:26+5:302017-09-15T01:14:40+5:30

Push to Vikas Thackeray | विकास ठाकरे यांना धक्का

विकास ठाकरे यांना धक्का

Next
ठळक मुद्देहायकोर्टाने याचिका फेटाळली : किशोर जिचकार यांचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर विकास ठाकरे यांना गुरुवारी जोरदार धक्का बसला. त्यांनी महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यत्वासाठी दाखल केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. त्यामुळे आता ठाकरे यांच्या महापालिकेतील एन्ट्रीला पूर्णविराम लागला आहे. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक किशोर जिचकार यांचा नामनिर्देशित सदस्यपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज, शनिवारी होऊ घातली आहे. तीत जिचकार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. नगरसेवक तानाजी वनवे यांची १६ मे रोजी गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या निवडीची १९ मे रोजी नोंदणी केली असली तरी, ते १६ मेपासूनच गटनेते झाले होते. त्यामुळे जिचकार यांनी १८ मे रोजी वनवे यांच्या पाठिंब्याने सादर केलेला नामनिर्देशित सदस्यत्वाचा अर्ज वैध ठरतो असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला.
ठाकरे यांनी जिचकार यांच्या नामांकन अर्जावर विविध आक्षेप घेतले होते. नामनिर्देशित सदस्यत्वासाठी नामांकन अर्ज सादर करण्याची मुदत १८ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत होती. विभागीय आयुक्तांनी वनवे यांची गटनेतेपदी नियुक्तीची १९ मे रोजी नोंदणी केली. परिणामी ते १९ मेपासून गटनेते झाले. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याने १८ मे रोजी सादर केलेला नामांकन अर्ज स्वीकारता येणार नाही असे ठाकरे यांचे म्हणणे होते. ठाकरे यांचा दावा फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने स्वत:च्याच ३१ आॅगस्टच्या निर्णयाचा आधार घेतला. त्या निर्णयाद्वारे न्यायालयाने महाकाळकर यांची वनवे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती.
त्यामुळे वनवे यांची नियुक्ती १६ मेपासूनच वैध ठरली होती. ठाकरे यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. उदय डबले व अ‍ॅड. शंतनू खेडकर, वनवे यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर, महाकाळकर यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता एस. के. मिश्रा, जिचकार यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता एम. जी. भांगडे महानगरपालिकेतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व अ‍ॅड. जेमिनी कासट तर, काँग्रेसतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.
अशा आहेत घडामोडी
महानगरपालिकेत काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. काँग्रेसने सुरुवातीला नगरसेवक संजय महाकाळकर यांची निर्धारित प्रक्रियेद्वारे गटनेतेपदी निवड केली होती. त्यांनी गटनेतेपदाची सूत्रे स्वीकारून कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी ठाकरे यांनी महाकाळकर यांच्या पाठिंब्याने नामनिर्देशित सदस्यत्वासाठी अर्ज सादर केला होता. दरम्यान, महाकाळकर यांच्याविरुद्ध १६ मे रोजी वर्धा मार्गावरील प्रगती भवन येथे नगरसेविका हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सदस्यांची बैठक झाली. त्यात वनवे यांची गटनेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेऊन विभागीय आयुक्तांना १६ नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी १९ मे रोजी आदेश जारी करून महाकाळकर यांना गटनेतेपदावरून कमी केले व वनवे यांची गटनेतेपदी निवड ग्राह्य धरली. त्यानंतर २० मे रोजी महापौर व मनपा आयुक्त यांनी या बदलाला मंजुरी दिली. मात्र, किशोर जिचकार यांनी १८ मे रोजीच वनवे यांच्या पाठिंब्याने नामनिर्देशित सदस्यत्वासाठी अर्ज सादर केला होता. मनपातील संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाट्याला नामनिर्देशित सदस्याचे एकच पद आले आहे.

Web Title: Push to Vikas Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.