पुष्पाराणी दीदी यांनी विदर्भात मानवता जागविली
By admin | Published: April 24, 2017 01:47 AM2017-04-24T01:47:53+5:302017-04-24T01:47:53+5:30
राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी दीदी यांना ज्यावेळी नागपूरचा कार्यभार देण्यात आला,...
पुष्पाराणी दीदी यांचे प्रथम पुण्यस्मरण : पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन
नागपूर : राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी दीदी यांना ज्यावेळी नागपूरचा कार्यभार देण्यात आला, तेव्हापासून त्यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या माध्यमातून विदर्भात मानवता जागविण्याचे महान कार्य केले. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्घांजली ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जामठा येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठात रविवारी आयोजित राजयोगिनी पुष्पाराणी दीदी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. बावनकुळे पुढे म्हणाले, एका संस्कारातून पुढील तीन पिढ्या संस्कारित होतात. त्यानुसार पुष्पाराणी दीदी यांनी नागरिकांच्या मनातून प्रदूषण दूर करून त्यांना सुसंस्कृत आणि अध्यात्मवादी बनविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. या कार्यक्रमाला माऊंट अबू येथून आलेले सूरजभाई, रुक्मिणी दीदी, रमेश दीदी, खासदार विकास महात्मे, माजी न्यायाधीश एस. डोणगावकर, माजी मंत्री रमेश बंग, विनोद गुडधे पाटील, आरएसएसचे महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. दिलीप म्हसे, शिशिर दिवटे, सुशील अग्रवाल व भाई देवकुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमरावती केंद्राच्या संचालिका सीता दीदी यांनी केले तर नागपूर केंद्राच्या संचालिका रजनी दीदी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
दु:खातही संयमातून मिळाली प्रेरणा
यावेळी खासदार विकास महात्मे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कधी ना कधी दु:ख येतातच. परंतु व्यक्तीने दु:खातही मनाला कसे बलवान ठेवायचे, त्यासाठी पुष्पाराणी दीदी यांच्याकडून प्रेरणा मिळते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठ हे जगातील एकमेव असे केंद्र आहे, की ज्याचे संपूर्ण संचालन महिलांच्या हाती आहे, असेही त्यांनी सांगितले. राजेश लोया म्हणाले, पुष्पाराणी दीदी ममता आणि वात्सल्याच्या मूर्ती होत्या. शिवाय रुक्मिणी यांनी विदर्भात १२३ केंद्र आणि उपसेवा केंद्र सुरू करून नागरिकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुष्पाराणी दीदी यांनी जीवनभर प्रयत्न केल्याचे सांगितले.