रॅगिंगच्या मानसिकतेवर वचक ठेवा
By admin | Published: August 18, 2015 03:19 AM2015-08-18T03:19:23+5:302015-08-18T03:19:23+5:30
विद्यापीठ परिसरात रॅगिंगच्या घटना होऊ नयेत याकरिता ‘यूजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) कडक निर्देश जारी
नागपूर : विद्यापीठ परिसरात रॅगिंगच्या घटना होऊ नयेत याकरिता ‘यूजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) कडक निर्देश जारी केले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठालादेखील यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. महाविद्यालयांचा शैक्षणिक विभाग, परिसर आणि वसतिगृहांमध्ये रॅगिंग होऊ नये याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना ‘यूजीसी’ने दिल्या आहेत.
अनेक उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात रॅगिंग होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन अभ्यास, त्यांचे भविष्याला हानी पोहोचू शकते. रॅगिंगसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध लागावा याकरिता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘यूजीसी’ने निरनिराळे अधिनियम तयार केले होते.
यूजीसीकडून विद्यापीठाच्या रॅगिंगबद्दलच्या धोरणांवर नाराजी जाहीर करण्यात आल्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी तातडीने समितीची स्थापना केली. या समितीच्या बैठकीदरम्यान विद्यापीठात रॅगिंगविरोधी मोहीम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रूपरेषा तयार करण्यात आली होती
परंतु तरीदेखील रॅगिंगचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विद्यापीठाने आणखी ठोस भूमिका घ्यायला हवी अशी सूचना ‘यूजीसी’तर्फे करण्यात आली आहे. जर कुठले विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने रॅगिंग संबंधातील सूचनांचे पालन केले नाही तर कडक कारवाई करण्याचा इशारादेखील ‘यूजीसी’ने दिला आहे. (प्रतिनिधी)
गो अहेड, रिपोर्ट रॅगिंग
४जर शैक्षणिक परिसरात रॅगिंगच्या घटना होत असतील तर विद्यार्थ्यांनी कोणालाही न घाबरता तक्रार करावी असे आवाहन ‘यूजीसी’तर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यापीठातील विभाग प्रमुख, विद्यार्थी कल्याणचे संचालक किंवा यूजीसीकडे याबद्दल तक्रार करु शकतात. विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी कायद्याची ओळख व्हावी याकरिता माहिती देणारे पोस्टर्स तयार करण्याच्या सूचनादेखील करण्यात आली आहे.
‘यूजीसी’ने केलेल्या सूचना
४शैक्षणिक विभाग, महाविद्यालय आणि वसतिगृहात रॅगिंगविरोधी दक्षता पथक स्थापन करणे.
४शैक्षणिक परिसराच्या प्रथमदर्शनी भागात सूचनाफलक लावणे.
४महाविद्यालय व वसतिगृहात प्रवेशाच्या वेळी रॅगिंग करणार नाही या आशयाचे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे.
४शैक्षणिक परिसरात रॅगिंगविरोधी जागृतीचे आयोजन करणे.
४विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी याकरिता निबंध व भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करणे.
दोषींना होणाऱ्या शिक्षा
महाविद्यालयातून हकालपट्टी
मेस आणि वसतिगृहात प्रवेशाला बंदी
शिष्यवृत्ती थांबविणे
परीक्षेला बसण्यास अनुमती नाकारणे
इतर संस्थात प्रवेशास बंदी
फौजदारी कारवाई