Vidhan Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:11 AM2019-09-27T11:11:04+5:302019-09-27T11:12:08+5:30

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पीडब्ल्यूडी अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपमध्ये दिव्यांग मतदारांनी नोंदणी केल्यास त्यांना मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

PWD App for Disability Voters | Vidhan Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप

Vidhan Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप

Next
ठळक मुद्दे रांगेत उभे राहावे लागणार नाहीमतदान केंद्रांवर मिळणार विशेष सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पीडब्ल्यूडी अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपमध्ये दिव्यांग मतदारांनी नोंदणी केल्यास त्यांना मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगांना मतदान करताना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विविध दिव्यांग स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, प्रा. विनोद आसुदानी, समाज कल्याणच्या सुकेशिनी तेलगोटे, अपंग असोशिएशनचे रणजित जोशी, संजय ककीर, आॅरेंज सिटी डेफ असोशिएशनचे रवी रक्षेल यांच्यासह विविध दिव्यांग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांगाने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असल्यास त्याने अ‍ॅड्रॉईड मोबाईलवर पीडब्ल्यूडी अ‍ॅप डाऊनलोड करावे. अगदी सोप्या पद्धतीने दिव्यांगत्वाची माहिती द्यावी. यासाठी दिव्यांगांना निवडणूक विभागाने दिलेला त्यांचा इपिक क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी वाहनासोबत व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागपूर लोकसभा निवडणुकीत ५४ टक्के मतदान झाले होते. मात्र त्यात दिव्यांग मतदारांची टक्केवारी ही ५६ टक्के होती, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ४९० दिव्यांगानी या अ‍ॅपमध्ये नोंदणी केली आहे. दिव्यांगांमध्ये जनजागृती करून त्यांना अ‍ॅपमध्ये नोंदणी करण्यासाठी विविध दिव्यांग स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवून दिव्यांगांपर्यंत पोहचण्याचा निवडणूक विभागाचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी ७०० जणांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. विविध मतदान केंद्रामध्ये रेलिंग लावणे, कर्णबधिरांसाठी सांकेतिक भाषा, माहिती पत्रके, सुविधादर्शक चिन्हे, रॅम्प लावणे, ब्रेल लिपी न येणाऱ्यांसाठी मतदान केंद्र्रात मदतनीसाची मदत घेता येणार आहे. सर्वाधिक दिव्यांग असलेल्या मतदान केंद्रांमध्ये त्यांच्या मागणीनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यावर निवडणूक विभागाचा भर राहणार आहे.

काय आहे पीडब्ल्यूडी अ‍ॅप
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी खास तयार केलेले अ‍ॅप असून, हे गुगल प्लेवरून अ‍ॅड्रॉईड मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे. या अ‍ॅपला मोबाईलची केवळ ६.२ एमबी जागा लागते. अ‍ॅप डाऊनलोड केल्यास इंग्रजी आणि हिंदी भाषेत माहिती भरण्याचा पर्याय आहे. त्यानंतर मोबाईल नंबर नोंदवावा. त्यावर ओटीपी येणार असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया करता येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दिव्यांग मतदाराला व्हीलचेअर उपलब्ध करून देणे, दिव्यांगाला त्याची विशेष नोंद (मार्क) करता येणे, तसेच त्याचे जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून स्थान नोंदवता येणार आहे. मतदानाच्या दिवशी त्याच्या मागणीनुसार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

Web Title: PWD App for Disability Voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.