अथेन्समधून सुरू झालेल्या आधुनिक मॅरेथॉनचा रंजक इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:24 AM2018-01-17T10:24:57+5:302018-01-17T10:25:32+5:30
मॅरेथानबाबत आपण खूप वाचले आणि ऐकले असेल. पण मॅरेथॉनची सुरुवात कशी झाली याबाबत फार कमी माहित असेल. मॅरेथॉन दौड’ मागे दडलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी ते आधुनिक मॅरेथॉनची वाटचाल याची माहिती देणारा हा लेख...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
प्राचीन आॅलिम्पिकमध्ये मॅरेथॉनचा समावेश नव्हता. १८९६ मध्ये आधुनिक आॅलिम्पिकचे पहिले आयोजन अथेन्स शहरात झाले.त्यामागे मोठा इतिहास आहे. इसवी सन पूर्व ४८० मध्ये ग्रीसच्या अथेन्स शहरापासून २६ मैल दूर दहा हजार ग्रीस सैनिक आणि जवळपास एक लाख पर्शियन सैनिक यांच्यात तुंबळ युद्ध लढले गेले.
या निर्णायक लढाईत दहा हजार ग्रीस सैनिकांनी पर्शियन सैनिकांचा पराभव करीत मायभूमीचे रक्षण केले.
ग्रीसच्या सैनिकांमध्ये प्रख्यात धावपटू फिडीपीड्स याचा समावेश होता.
युद्ध जिंकल्यानंतर त्याने अथेन्स शहराकडे धाव घेतली. युद्धामुळे थकवा आल्यानंतरही पर्वत आणि नद्या ओलांडून तो अथेन्स शहरात आला तेव्हा घामाने ओलाचिंब झाला होता. त्याचा श्वास थांबण्याची शक्यता वाटत होती.
जमिनीवर कोसळण्याआधी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘माझ्या देशवासीयांनो आम्ही युद्ध जिंकले आहे. आनंद साजरा करा’’. यानंतर तो कोसळला. वीरमरण आलेल्या फिडीपीड्सच्या स्मरणार्थ मॅरेथॉन दौडचा समावेश १८९६ च्या आॅलिम्पिकमध्ये करण्यात आला. आॅलिम्पिकचा समारोप मॅरेथॉननेच केला जातो हे विशेष.
आधुनिक मॅरेथॉनचे अंतर ४२.१९५ किमी इतके निर्धारित करण्यात आले आहे. अथेन्सच्या पहिल्या आॅलिम्पिकमध्ये ग्रीसचे धावपटू पाठविण्यासाठी देशात एका दौडचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी चारिला ओस वासिलाकोस याने ३ तास १८ मिनिटांत हे अंतर गाठले होते.
१० एप्रिल १८९६ रोजी आधुनिक आॅलिम्पिकची पहिली मॅरेथॉन जिंकण्याचे भाग्य ग्रीसचा धावपटू स्पायरिंडो लुईस याच्या वाट्याला आले. त्याने ही दौड २ तास ५८ सेकंद अशा वेळेची नोंद करीत जिंकली.
महिलांसाठी पहिली मॅरेथॉन दौड सर्वांत आधी १९८४ च्या लॉस एंजिलिस आॅलिम्पिकमध्ये आयोजित झाली. त्यावेळी दौडमध्ये केवळ दोन महिला धावपटू सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी एक आॅस्ट्रेलियाची लिझा ओंदिका ही होती. लिझाने पुढे १९८८ च्या सेऊल आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदकही जिंकले.
आधुनिक मॅरेथॉनचे अंतर ४२.१९५ किमी इतकेच का, यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ग्रीसच्या सैनिकाने विजयी दौड लावली ते अंतर जितके होते, तितकेच अंतर आधुनिक मॅरेथॉनसाठी निर्धारित करण्यात आले आहे.
१८९६ पासून २०१६ च्या सर्व आॅलिम्पिकमध्ये काही अपवाद वगळता आफ्रिकेतील धावपटूंनी मॅरेथॉनवर वर्चस्व गाजविले. कॅनडा आणि अमेरिकेचे धावपटूही मागे नाहीत.त्यांनी अधूनमधून पुरुष आणि महिला मॅरेथॉनमध्ये बाजी मारली.