क्यू नेट : फसवणुकीच्या पैशातून विदेशात ऐश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 09:47 PM2018-01-31T21:47:22+5:302018-01-31T21:49:01+5:30
क्यू नेट बिझनेस पोर्टलमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी कमिशनच्या पैशातून विदेशात ऐश केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्यू नेट बिझनेस पोर्टलमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी कमिशनच्या पैशातून विदेशात ऐश केली. आरोपी सापडल्यानंतर ही बाब उघडकीस आली. दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांनी आणखी एक आरोपी प्रशांत दत्तात्रय धार्मिक याला अटक केली आहे. मंगळवारी रात्री प्रशांतची पत्नी मृणाल धार्मिक, कविता अविनाश खोंडे, प्रशांत श्यामराव डाखोळे आणि त्याची पत्नी प्रज्ञा डाखोळे यांना अटक केली होती. त्यांचे साथीदार आशिष लुनावत, किशोर भांडारकर, मंगेश चिकारे, त्याची पत्नी ऋतुजा चिकारे आणि श्रीकांत रामटेके यांना पोलीस शोधत आहे.
पोलिसांकडे आतापर्यंत तक्रारकर्त्या आंचलसह १२ पीडित पोहोचले आहे. त्यांची ९३ लाख २१ हजार २५६ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी आणखीही अनेक लोकांना फसवले आहे. त्यांना कमिशनच्या रूपात कोट्यवधी रुपये मिळाले. आतापर्यंतच्या तपासात मृणाल धार्मिक आणि पुण्यातील लुनावत बंधू हे या फसवणुकीचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. आरोपी अनेक दिवसांपासून क्यू नेटच्या माध्यमातून लोकांना फसवित होते. प्रशांत धार्मिक वगळता अटकेतील सर्व आरोपी आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याची त्यांची पद्धत वेगळी होती. ते लोकांना क्यू नेटच्या माध्यमातून घरबसल्या कमाई करण्याचे आमिष दाखवित होते. क्यू नेटशी जुळल्यानंतर ते कंपनीची आर्थिक प्रगती आणि देश-विदेशात प्रवासाची माहिती द्यायचे. एखादा व्यक्तीने क्यू नेटची योजना आणि गुंतवणुकीबाबत विचारपूस केली तर त्याला नियमाचा हवाला देत गुंतवणूक करून सदस्य झाल्यावरच त्याची माहिती संबंधितांना दिली जाते, असे सांगितले जात होते. तसेच तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचीच गुंतवणूक स्वीकारली जात असल्याचेही सांगितले जायचे. रुपये जमा केल्यानंतर संबंधितांना त्या मोबदल्यात एक भेटवस्तू दिली जायची. यात नकली दागिने, घड्याळ, हॉटेल किंवा रिसॉर्ट डिस्काऊंटचे कूपन दिले जात होते. लाखो रुपयांची गुंतवणूक केल्यावर अशा प्रकारच्या भेटवस्तू पाहून अनेकजण विरोध करायचे. तेव्हा त्यांना आणखी १० जणांना जोडून कमिशन कमावण्यासाठी मजबूर केले जात होते.
पैसे परत मिळण्याचा कुठलाही मार्ग दिसून येत नसल्याने ते नवीन सदस्या जोडू लागत. चेन सिस्टीममध्ये नवीन सदस्य जोडणाऱ्याला त्याच्या कमिशनचे पैसे ई-कार्डद्वारे आरोपींनी उघडलेल्या खात्यामध्येच जमा केले जात होते. त्या खात्यातून पैसे काढण्याचा अधिकारही आरोपींनाच होता. गुंतवणूकदार केवळ त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याच्या माहितीनेच संतुष्ट होते. आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांच्या नावावर बोगस खाते उघडून त्यांच्या नावावरील कमिशनचे लाखो रुपयेसुद्धा गहाळ केले. ही रक्कम आरोपींनी विदेश यात्रेवर खर्च केली. प्रशांत धार्मिक वगळता सर्व आरोपी आयुर्वेद डॉक्टर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्यावर विश्वास बसत होता. आरोपी गुंतवणूकदारांना चेन सिस्टीम अंतर्गत नवीन ग्राहकांना कसे जोडता येईल, यासाठी धरमपेठ येथील एका कार्यालयात ते प्रशिक्षण सुद्धा देत होते. तिथे लोकांशी कसे बोलावे, क्यू नेटचे महत्त्व कसे समजावून सांगावे आदींचे प्रशिक्षण दिले जात होते. तपास अधिकारी एम.डी. शेख यांनी आरोपींना बुधवारी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले.
कर्ज घेऊन केली गुंतवणूक
अनेक पीडितांनी बँकेतून व्यक्तिगत कर्ज घेऊन गुंतवणूक केली. आता त्यांच्याकडे बँकेचे हप्ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. एका गुंतवणूकदाराने तर दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले. आरोपीच त्याला दागिने गहाण ठेवण्यासाठी सावकाराकडे घेऊन गेले होते.
बोगस कंपनीही बनवली
गुंतवणूक केल्यावर काही दिवसांनीच पीडितांना क्यू नेटद्वारा फसवणूक करण्यात येत असल्याचे माहीत झाले. त्यांनी आरोपींना यासंदर्भात विचारणा करीत आपले पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी क्यू नेट बंद झाल्याचे सांगून त्याऐवजी विहान डायरेक्ट ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. सुरू करण्यात आल्याचे सांगितले. या कंपनीत केलेली गुंतवणूक सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. विहान ही बोगस कंपनी असल्याचा पोलिसांना संशय आहे.