बनावट ई-मेल खात्यामुळे प्र-कुलगुरू हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:11 AM2021-08-23T04:11:51+5:302021-08-23T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे यांच्या नावाने बनावट फेसबुक व ई-मेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे यांच्या नावाने बनावट फेसबुक व ई-मेल आयडी तयार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याअगोदरदेखील त्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार झाला आहे. आता बनावट ई-मेलमुळे अनावधानाने महत्त्वाची व गोपनीय माहिती चुकीच्या हाती पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुधे यांनीच ही बाब समोर आणली असून नागपूर विद्यापीठातील मोठ्या अधिकाऱ्यासोबत पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे.
संजय दुधे हे अगोदरपासूनच सोशल माध्यमांवर सक्रिय आहेत. त्यांचे फेसबुकवर खातेदेखील आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने त्यांच्या फेसबुक खात्याशी छेडछाड करण्याचे प्रकार होत आहेत. त्यांच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून विद्यापीठ वर्तुळासह शिक्षण मंचातील अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली. ३० जुलै रोजी यासंदर्भात डॉ.दुधे यांनी फेसबुकवरच सर्वांना सावध राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर तीन आठवड्यांतच कुणीतरी त्यांच्या नावाने ऑफिशिअलमेलिंग.ईडीयू@जीमेल.कॉम हा जी-मेल आयडी तयार केला व त्यावरून अनेकांना ई-मेल पाठविण्यात आले. ही बाब समोर आल्यानंतर रविवारी दुधे यांनी याबाबत सर्वांना सतर्क केले आहे. या अगोदरही अनेकदा असल्या प्रकारे बनावट आयडी तयार करून ऑनलाईन पैसे मागण्यात आले होते, संबंधित ई-मेल आयडी माझा नसल्यामुळे कृपया कुणीही त्याला उत्तर देऊ नये व कुठलाही कार्यालयीन व आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन प्र-कुलगुरूंनी केले आहे.
मे महिन्यात झाले होते फेसबुक खाते हॅक
डॉ.संजय दुधे यांच्यासोबत अनेक दिवसांपासून असा प्रकार सुरू आहे. मे महिन्यात त्यांचे जुने फेसबुक खाते हॅक झाले होते. त्यांच्या नावावर विविध पे वॉलेट्सवर पैसे मागण्यात आले होते. प्र-कुलगुरूंशी अनेक जण ई-मेलवर संपर्क साधत असतात. बनावट ई-मेलला खरा मानून गोपनीय माहिती पाठविली तर ती अयोग्य व्यक्तीच्या हाती पडण्याचा धोका आहे. विद्यापीठातील एकाच अधिकाऱ्यावर अशा प्रकारे सायबर बनावटपणा होत असल्याने विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.