कतार एअरवेजचे संचालन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:10 AM2021-02-27T04:10:05+5:302021-02-27T04:10:05+5:30
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या पाच वर्षांपासून संचालन होणाऱ्या कतार एअरवेजची नागपूर-दोहा विमानसेवा आता बंद झाली ...
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या पाच वर्षांपासून संचालन होणाऱ्या कतार एअरवेजची नागपूर-दोहा विमानसेवा आता बंद झाली आहे. चार दिवसांपूर्वीच कंपनीने नागपुरातील कार्यालयाला टाळे ठोकले आणि विमानतळावरील काऊंटर बंद केले आहे.
कतार एअरवेज संचालन २००८ मध्ये मोठ्या उत्साहात सुरू झाले होते. त्यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर अल बकर नागपुरात आले होते. नागपूर विमानतळावर एका समारंभासह या कंपनीचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या काळात कंपनी जास्त दिवस सुरू राहिली नाही आणि २०१० मध्ये संचालन बंद करण्यात आले. डिसेंबर २०१५ पासून कतारने पुन्हा विमानसेवा सुरू केली. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनपूर्वी विमानसेवा सुरू होती.
कंपनीच्या नागपुरातील कार्यालयात सहा ते सात कर्मचारी कार्यरत होते. त्यांची सेवा २२ फेब्रुवारीपासून समाप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागत होते आणि विमानतळावर काऊंटरचे भाडे नियमितपणे चुकते करावे लागत होते. या सर्व कारणांमुळे एअरलाईन्सने सध्या कार्यालय व काऊंटर बंद केले आहे. सूत्रांनी सांगितले, कतारकरिता नागपूर व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहे. येथून जास्त प्रवासी मिळतात. कतार एअरलाईन्स पहिले विमानसेवा सुरू करते आणि नंतर केव्हाही बंद करते तसेच परिस्थिती पाहून संचालन पुन्हा सुरू करते, असा कंपनीचा इतिहास आहे. कंपनीप्रति भारतीय मंत्रालयाची भूमिका लवचिक असते आणि प्रत्येकवेळी सहकार्य करण्यात येते. या संदर्भात कतार एअरवेजच्या विमानतळ व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.