कतार एअरवेजच्या विमानात बिघाड, उड्डाण रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:04 AM2019-07-09T00:04:16+5:302019-07-09T00:05:14+5:30
कतार एअरवेजच्या विमानामध्ये सोमवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान आपल्या निर्धारित वेळेत उड्डाण करू शकले नाही. तब्बल चार तासांनी दुरुस्त झाल्यावर सकाळी ७ वाजता ते प्रवाशांविना दोहाकडे रवाना झाले. यातील प्रवाशांची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कतार एअरवेजच्या विमानामध्ये सोमवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान आपल्या निर्धारित वेळेत उड्डाण करू शकले नाही. तब्बल चार तासांनी दुरुस्त झाल्यावर सकाळी ७ वाजता ते प्रवाशांविना दोहाकडे रवाना झाले. यातील प्रवाशांची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली.
कतार एअरवेजचे हे क्यूआर-५९१ विमान नागपूरहून दोहाकडे उड्डाण भरण्यासाठी सोमवारी पहाटे ३.४० वाजता सज्ज होते. मात्र विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याची पायलटला शंका आली. या दुरुस्तीचे काम सुरू झाले. बराच वेळपर्यंत बिघाड सापडला नाही. तब्बल दोन तासांनंतर दोष लक्षात आल्यावर दुरुस्ती झाली. मात्र यात चार तास निघून गेले. यादरम्यान वैमानिकांचे दल आणि केबिन क्रूच्या कामाची वेळ संपली. नागपुरात आधीपासूनच दुसऱ्या पाळीतील वैमानिकांचे दल उपस्थित होते. मात्र केबिन कू्रची व्यवस्था न झाल्याने दुसऱ्या चालकांच्या दलाने सकाळी सुमारे ७ वाजता हे विमान प्रवाशांविना रिकामेच दोहाला नेले.
ही विमानसेवा रद्द केल्यावर यातील सुमारे ७० प्रवाशांपैकी काही आपल्या घरी परतले, तर बरेचशे प्रवासी एका हॉटेलमध्ये मुक्कामी राहिले. याव्यतिरिक्त काही प्रवाशांना मुंबईमार्गे दोहाला पाठविण्यात आले. उर्वारित प्रवाशांना मंगळवारी पहाटेच्या विमानाने रवाना केले जात आहे.