हिवाळी अधिवेशनासाठी जारी निविदांमधे साध्यासाध्या वस्तूंना लावले चौपट दर; तयारीच्या कामाला बसला झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 09:06 PM2021-10-27T21:06:37+5:302021-10-27T21:07:19+5:30
Nagpur News ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन तयारीच्या सुरुवातीलाच झटका बसला.
नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन तयारीच्या सुरुवातीलाच झटका बसला. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)ने तयारीसाठी आवश्यक विविध वस्तूंसाठी जारी केलेल्या बहुतांश निविदा रद्द केल्या आहेत. अनेक वस्तूंचे दर हे अधिक दर्शविल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी नुकतेच नागपुरात येऊन आढावा घेतला. त्यानंतर तयारीच्या कामाला गती मिळाली होती. काही मंत्री नागपुरात अधिवेशन घेण्याच्या विरोधात असल्याचेही वृत्त आहेत. यातच आता पीडब्ल्यूडीने ५० कोटीच्या तब्बल १०० पेक्षा अधिक निविदा रद्द केल्या आहेत. यात देखभाल दुरुस्तीपासून तर विविध वस्तू उपलब्ध करण्याच्या निविदांचा समावेश आहे.
कंत्राटदारांनी अगोदर हो-नाही करत अखेर काम करण्यास तयारी दर्शविली. परंतु असेही सांगण्यात येत आहे की, त्यांना मिळालेल्या आश्वासनानुसार दिवाळीपूर्वी २०१९ मधील कामांचे थकीत ५० कोटी रुपये मिळाले नाही तर ते काम थांबवतील. विशेष म्हणजे विदभार्तील सर्व कंत्राटदारांचे मिळून या महिन्यात जवळपास सरकारकडे ५०० कोटींची थकबाकी आहे. याविरोधात कंत्राटदारांनी आंदोलनही केले आहे.
या दरम्यान पीडब्ल्यूडीने नवीन कामांच्या निविदा जारी केल्या. कोविड संक्रमणामुळे पहिल्यांदा सॅनिटायझर, मास्क खरेदीचे टेंडरही जारी झाले. यात गडबड अशी झाली की ५ रुपयाला मिळणारे मास्कचे दर २५ रुपये निश्चित करण्यात आले. सॅनिटायझरसुद्धा एका लिटरसाठी ६०० रुपयापेक्षा अधिक दर दर्शविण्यात आले. हे दर बाजारभावापेक्षा दुप्पट आहेत. पाण्याचा पुरवठ्यासाठी चार पटीने अधिक दर निश्चित करण्यात आले. निविदा जारी झाल्यास मोठे वादळ उठले असते. त्यामुळे पीडब्ल्यूडीने तातडीने सर्व टेंडर रद्द केले.
असे होते दर
वस्तू - दर - बाजारभाव
सॅनिटायझर - ८ हजार रुपये - ३ हजार रुपये
२० लिटर पाणी कॅन - ९५ रुपये - २० ते ३० रुपये
मास्क - २५ रुपये - ५ रुपये
आमदार निवास - १६,३५,०२१ रुपये
इतर इमारती - ४,९६,१७८
आता दिवाळीनंतरच हालचाली
पीडब्ल्यूडीचे म्हणणे आहे की, पुढच्या सोमवारी नवीन दरांसाठी निविदा जारी करण्याची तयारी होत आहे. परंतु या निर्णयामुळे कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे. उर्वरित निविदाही रद्द होऊ शकतात, या भीतीने त्यांनी सर्व कामे थांबवली आहेत. आता दिवाळीनंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. कामांबाबत हालचाली दिसून येतील.
पारदर्शकतेसाठी घेतला निर्णय
निविदा प्रक्रिया पारदर्शी ठेवण्यासाठी विविध वस्तूंच्या खरेदीचे टेंडर रद्द करण्यात आले आहे. काही वस्तूंचे दर हे त्यावेळचे आहेत जेव्हा कोविड संक्रमण शीर्षस्थानी होेते. आता हे दर खूप कमी झाले आहेत. त्यामुळे डेप्युटी इंजिनियरला आजच्या दरानुसार निविदा जारी करण्यास सांगितले आहे. कमीत कमी खर्चात हिवाळी अधिवेशनाची तयारी करण्याचा संकल्पसुद्धा केला आहे. विभाग या दिशेने कार्य करीत आहे.
जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता,सार्वजनिक निर्माण विभाग