नागपूर विभागातील महाविद्यालयांतून घडत आहेत दर्जेदार अभियंते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:35 AM2020-12-16T11:35:54+5:302020-12-16T11:36:58+5:30
Nagpur News सर्वसाधारणत: पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते असा समज आहे. परंतु प्रत्यक्षात नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा वाढत असून तेथून दर्जेदार अभियंते तयार होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसाधारणत: पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते असा समज आहे. परंतु प्रत्यक्षात नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा वाढत असून तेथून दर्जेदार अभियंते तयार होत आहेत. विशेष म्हणजे उद्योगक्षेत्राची आवश्यकता लक्षात घेऊन प्रात्यक्षिक व ‘इंटर्नशीप’वर भर देण्यात येत असल्याचा सूर विविध तज्ज्ञांनी व्यक्त केला. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ‘व्हाय शुड आय स्टडी इंजिनिअरींग’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सहकार्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयानेदेखील पुढाकार घेतला आहे. सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सोबत मिळून ‘डीटीई’तर्फे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. त्यासंदर्भात विविध तज्ज्ञांनी नेमकी स्थिती व तथ्या मांडले. नागपूर विभागातील ४४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी यंदा चुरस राहणार आहे. एकूण प्रवेशक्षमता १७ हजार १३६ असून ‘एमएचटीसीईटी’ला २७ हजार २७५ विद्यार्थी उपस्थित होते. ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी १० हजार ३७३ जागाच आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक डॉ.राम निबुदे यांनी दिली.
प्रत्येक विकासात्मक कामाच्या मागे अभियंत्यांची मेहनत असते. उद्योगक्षेत्रालादेखील शैक्षणिक संस्थांमधून दर्जेदार अभियंते निघतील अशीच अपेक्षा असते. त्यामुळे अभियांत्रिकीची मागणी कधीच कमी होणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यावेळी उद्योगक्षेत्र, प्रेरक वक्ते तसेच माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ माध्यमातून संबोधित केले. यात डॉ.एन.डी.घवघवे, सी.जी.शेगावकर, शशिकांत चौधरी, हेमंत पालीवाल, सुमंत टेकाडे, अरविंद कुमार, महेश रखिजा व माजी विद्यार्थिनी मैथिली मांडवगणे यांचा समावेश होता