चिमुकल्या कलावंताचे दर्जेदार सादरीकरण

By Admin | Published: December 30, 2014 12:56 AM2014-12-30T00:56:51+5:302014-12-30T00:56:51+5:30

बालकलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य महोत्सवात सोमवारी चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

A quality presentation of a small family artist | चिमुकल्या कलावंताचे दर्जेदार सादरीकरण

चिमुकल्या कलावंताचे दर्जेदार सादरीकरण

googlenewsNext

राज्य बालनाट्य स्पर्धा : नाट्यरसिक मंत्रमुग्ध
नागपूर : बालकलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य महोत्सवात सोमवारी चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. हा महोत्सव सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे सुरूआहे. यात संस्कार, तमसो मा ज्योतिर्गमय, नवे गोकुळ आणि सोनेरी पान या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात चिमुकल्या कलावंतांनी सादर केलेल्या दर्जेदार अभिनयाने उपस्थित नाट्यरसिक मंत्रमुग्ध झाले.
नैतिक संस्काराची शिकवण ‘संस्कार’
विद्यार्थ्यांच्या बालमनाच्या निकोप व सशक्त संवर्धनासाठी अनिवार्य अशा नैतिक संस्काराच्या शिकवणुकीचे महत्त्व विशद करणारे ‘संस्कार’ या नाटकाचे सादरीकरण छत्रपती युवक क्रीडा प्रसारक मंडळ महालतर्फे करण्यात आले. आजच्या वैज्ञानिक युगात ऱ्हास पावणाऱ्या नैतिक मूल्यांबद्दल अस्वस्थता व्यक्त करणाऱ्या या सादरीकरणात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्याधिष्ठित आदर्श जीवन प्रणालीवर भर देण्यात आला. नाटकाचे लेखन सीमा फडणवीस यांनी केले. दिग्दर्शन सुबोध आष्टीकर यांचे होते. विधी पेटकर, अंजली नंदवंशी, जान्हवी ढोके, प्राची बसाके, धनश्री भेंडे, प्रणाली मारोडकर, मिताली गौरकर, साक्षी तिजारे, जान्हवी कोंगलवार, प्राची मानापुरे, केशरी मौंदेकर, दिव्या शेळके या कलावंतांचा यात सहभाग होता.
आनंदी जगण्याचा संदेश देणारे ‘तमसो मा ज्योतिर्गमय’
अंध मुलांच्या दु:खी मनोभावनांवर हळुवार फुंकर घालणारे व प्राप्त परिस्थितीवर मात करून आनंदी जगण्याचा संदेश देणाऱ्या ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ नाटकाचे सादरीकरण दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, महालतर्फे करण्यात आले. विशाल तराळ लिखित या नाटकाचे दिग्दर्शन रोशन नंदवंशी यांनी केले. यात श्रेया कुराडे, अंजली तिवारी, श्रद्धा परिहार, प्राची रणदिवे, प्रियंका वंजारी, अवंती कुर्रेवार, जान्हवी हुकरे, अमिषा निचंत, ऐश्वर्या डवरे यांनी अभिनय केला.
श्रमाचे महत्त्व विशद करणारे ‘नवे गोकुळ’
जीवनातील श्रमाचे महत्त्व सांगणाऱ्या गंभीर विषयाला विनोदाची जोड देऊन भरभरून मनोरंजन करणारे ‘नवे गोकुळ’ या नाटकाने रसिकांना जिंकले. नाटकातील सोंगाड्याचा अभिनय प्रशंसनीय ठरला. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ महालद्वारे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. पु. ल. देशपांडे लिखित या नाटकाची निर्मिती रवींद्र फडणवीस यांनी केली. दिग्दर्शन अर्चना घुळघुळे यांचे होते. यात युक्ता हजारे, अपूर्व देवरणकर, श्वेता बावनकुळे, सेजल पापडकर, दीपाली मानकर, वैष्णवी हुकरे, आदिती हरदास, शिप्रा विटाळकर, सेजय कोलूरवार, साक्षी तीनखेडे, अपूर्वा गवळी, धनश्री माताघरे, ऋतिका गोखे, सायली घाटोळे, खुशी गोखे, मृणाली मेरखेड, दीपाली वाघमारे, रुचिका मारघडे, कल्याणी देशमुख यांनी अभिनय केला. (प्रतिनिधी)

Web Title: A quality presentation of a small family artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.