नागपुरातील नवीन प्रशासकीय इमारतीत ‘क्वारंटाईन’ केंद्र?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:41 PM2020-04-07T12:41:22+5:302020-04-07T12:42:17+5:30
सरकारी यंत्रणेकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचादेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र म्हणून उपयोग करण्याचा विचार सुरू आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चे संकट अद्यापही कायम असून रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांना ‘क्वारंटाईन’ करण्यात येत आहे. यासाठी आमदार निवासासह विविध शासकीय इमारतीत व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता सरकारी यंत्रणेकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचादेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र म्हणून उपयोग करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणीदेखील केली असून लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘कॅम्पस’कडून अंबाझरीकडे जाणाऱ्या मार्गावर नागपूर विद्यापीठाची नवीन प्रशासकीय इमारत आहे. या इमारतीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प, ‘ग्रीन वॉटर हार्वेस्टिंग’ अशा अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. शिवाय तळमजल्यासह अन्य तीन माळ्यांवर छोटे-मोठे असे एकूण पाच सभागृह बांधण्यात आले आहेत. चार मजल्यांच्या या इमारतीमध्ये मोठी दालने आहेत. विशेष म्हणजे ही इमारती नागरी वस्तीपासून काहीशी दूर आहे. मागील महिन्यातच येथे विद्यापीठ प्रशासनातील काही विभाग हलविण्यात आले आहेत. येथे ‘लिफ्ट’ नसल्याने वरील तीन मजल्यांचे ‘आॅक्युपन्सी’ प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे केवळ तळमजलाच वापरला जात आहे.
‘कोरोना’च्या संकटामुळे परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेकडून संशयित लोकांना ‘क्वारंटाईन’ करण्यासाठी विविध इमारतींचा शोध सुरू आहेच. नागपूर विद्यापीठाच्या या इमारतीचा मोकळेपणा व एकूण जागा लक्षात घेता येथे ‘क्वारंटाईन’ केंद्र तयार होऊ शकते का, यासंबंधात सरकारी यंत्रणेकडून मागील आठवड्यात चाचपणी करण्यात आली.
मनपाचे पथक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, अभियंता यांनी येऊन या इमारतीची पाहणी केली. तसेच यासंबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला कळविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यासंबंधात प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. सरकारी यंत्रणेकडून आम्हाला विचारण्यात आले. तसेच इमारतीबाबत माहिती घेण्यात आली. अभियंत्यांनी येऊन पाहणीदेखील केली आहे. जर ‘क्वारंटाईन’ केंद्र करण्याबाबत निश्चित झाले तर दोन दिवस अगोदर विद्यापीठाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर तातडीने विद्यापीठाला इमारत स्वच्छ करून सरकारी यंत्रणेच्या हवाली करावी लागेल, असे सांगण्यात आल्याचे डॉ. खटी यांनी स्पष्ट केले.
सरकारला लिहिले होते पत्र
यासंदर्भात नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालकांना पत्र लिहिले होते. आमदार निवासासह इतर शासकीय इमारती अपुऱ्या पडू शकतात. त्यामुळे नागपूर विद्यापीठाची नवीन इमारत ही ‘क्वॉरंटाईन’ केंद्र करण्यासाठी ताब्यात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.