'क्वारंटाईन'केंद्र की 'पिकनिक'चे स्थळ? : 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:08 PM2020-04-21T21:08:09+5:302020-04-21T21:09:18+5:30
लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’वर अद्यापही लस किंवा औषध निघाले नसल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच प्रभावी उपाय मानण्यात येत आहे. विशेषत: ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्यांनी तर याचे पालन करणे अनिवार्यच आहे. परंतु लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे. एकमेकांच्या थाळ्यांमध्ये जेवण करणे, गच्चीवर एकत्रित येऊन गप्पा हाकणे असे प्रकार सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे प्रकार सुरू असूनदेखील कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे ‘क्वारंटाईन’ केंद्र आहे की सहलीचे ठिकाण, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
लोणारा येथील एका महाविद्यालयात ‘क्वारंटाईन’ केंद्र स्थापित करण्यात आले आहे. येथे एकूण ११६ संशयित ठेवण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील सभागृहात त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. येथील बºयाच लोकांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’देखील निघाली. ‘कोरोना’चा संसर्ग लवकर होतो, हे माहिती असूनदेखील हे सर्व लोक एकत्रितच राहत आहेत. सायंकाळच्या सुमारास तर बहुतांश जण इमारतीच्या गच्चीवर एकत्रित येतात व गप्पांचा फड रंगतो. याशिवाय अनेक जण सोबतच बसून जेवण करत आहेत. अशा स्थितीत ज्या व्यक्तीला लागण झालेली नाही, त्यालादेखील संसर्ग होण्याचा धोका आहे.
सोमवारी या केंद्रातून ७० हून अधिक जणांना सोडण्यात आले. तर ‘पॉझिटिव्ह’ आलेल्यांना उपचारासाठी नेण्यात आले. तर दोन आणखी केंद्रात लोक दाखल झाले. सद्यस्थितीत येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेले ३९ लोक आहेत.
गंभीर कधी होणार?
शहरात ‘कोरोना’बाधितांची संख्या शंभरच्या जवळ पोहोचली आहे. अशा स्थितीत ‘क्वारंटाईन’ असलेल्यांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु लोणारा येथील केंद्रातील प्रकार अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. प्रशासन यासंदर्भात गंभीर कधी होणार तसेच लोकदेखील स्वत:ची जबाबदारी कधी ओळखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्मचारीदेखील धोक्यात
लोणारा येथील केंद्रावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरविण्यात आलेली नाही. इतर ‘क्वॉरंटाईन’ केंद्रात रात्रपाळीत असलेल्यांसाठी झोपण्यासाठी सोय आहे. लोणाऱ्यात तीदेखील सोय नाही. त्यामुळे नाईलाजाने उघड्यावर झोपावे लागत आहे. शिवाय अर्ज भरुन घेण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अस्थमा व ह्रद्यविकाराची समस्या आहे. मात्र तरीदेखील त्यांनाच सर्वांना सामोरे जावे लागत आहे.