लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:36 PM2020-04-24T23:36:45+5:302020-04-24T23:38:24+5:30

अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वानाडोंगरी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.

The quarantine center at Wanadongri was removed due to public outcry | लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले

लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले

Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध, ठिय्या आंदोलन : जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील संशयितांना वानाडोंगरीतील क्वारंटाइन सेंटर येथे हलवण्यात आले होते. परंतु याला स्थानिक नागरिकांसह आमदार व त्या भागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. इतकेच नव्हे तर हे सेंटर नागपुरात हलवण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.
हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात सामाजिक न्याय विभागाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह आहे. येथील इमारतीत ३१ खोल्या असून येथे नागपूर शहरातील १२६ जणांना कोरोना विषाणू संशयित म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. ज्यांना येथे क्वारंटाइन करण्यात आले, ते नागपूर शहरातील सतरंजीपुरा परिसरातील लोक होते. सध्या सतरंजीपुरा हा परिसर सर्वाधिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातोय. नागपुरातील अर्ध्यापेक्षा अधिक कोेरोनाच्या केसेस याच परिसरात आढळून आल्या आहेत. त्यामुळे येथील लोकांना हिंगणा येथील वानाडोंगरीत आणले गेल्याची माहिती मिळताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही याला विरोध केला. आ. समीर मेघे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वानाडोंगरी ही नगर परिषद १२०८ हेक्टर क्षेत्रात पसरली असून ५० हजार लोकसंख्येची दाट वसाहत आहे. येथेच एमआयडीसीमधील कारखान्यात काम करणारे कामगार, लहानमोठे व्यावसायिक आणि रोजमजुरी करणारी कुटुंबे राहतात. त्यामुळे कोरोना संशयित आपल्या परिसरात राहत असल्याने त्यांच्यातही भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वानाडोंगरी येथील ज्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले तेथे खोलीनिहाय पुरेशी व्यवस्था नाही. वसतिगृहाच्या इमारतीलगतच शहराला पाणीपुरवठा होणारी विहीर आहे.
त्यांना अशा दाट लोकवसाहतीत ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.यावेळी त्यांच्यासोबत वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा वर्षा शाहाकार, जिल्हा परिषद सदस्य राजू हरडे, उपसरपंच कैलाश गिरी, माजी जि.प. सदस्य अंबादास उके, सतीश शाहाकार, उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता, आभा काळे, सभापती बाळू मोरे, सचिन मेंडजोगे आदी होते.
यासोबतच माजी मंत्री रमेश बंग यांनीही येथील क्वारंटाईन सेंटर हटवण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जि.प. सदस्य दिनेश बंग, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, सुचिता विनोद ठाकरे, सभापती बबनराव आव्हाळे, तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, विनोद ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे यांनीही जिल्हाधिकारी ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.
एकूणच लोकप्रतिनिधींचा येथील क्वारंटाईन सेंटरला असलेला विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील क्वारंटाईन सेंटर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचे आश्वासन दिले. शहरातील दुसऱ्या ठिकाणी ज्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जागा उपलब्ध होती, तिथे स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत स्थानांतरणाची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: The quarantine center at Wanadongri was removed due to public outcry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.