आता वाढविली जाताहेत क्वारंटाईन केंद्र : सिम्बॉयसिस कॉलेजमध्येही केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:53 AM2020-04-26T00:53:41+5:302020-04-26T00:55:01+5:30
कोवीड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे .याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोवीड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे .याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शहरात सर्वप्रथम आमदार निवासात क्वारंटाईन कें द्र सुरू करण्यात आले. यासाठी २१० खोल्या आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर वनामती व रविभवन येथे केंद्र सुरू करण्यात आले. संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता लोणारा येथील फार्मसी कॉलेज येथे सुद्धा संशयितांना ठेवण्यात आले. यादरम्यान वानाडोंगरी येथील विद्यार्थी वसतिगृहाला केंद्राचे स्वरूप देण्यात आले. परंतु नागरिकांचा विरोध लक्षात घेता येथे ठेवण्यात आलेल्या लोकांना शुक्रवारी दुसऱ्या केंद्रात नेण्यात आले. मात्र येथील केंद्र पूर्णपणे बंद केले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यात गरज पडल्यास या केंद्रात संशयितांना ठेवले जाणार आहे. दरम्यान क्वारंटाईन केंद्रावरील वाढता भार व संशयितांची वाढती संख्या विचारात घेता जिल्हा प्रशासनाने १० हजार लोकांना क्वारंटाईन ठेवता येईल, अशी तयारी केली आहे. सध्या शहरात ७ क्वारंटाईन केंद्र तयार करण्यात आले आहेत. गरज पडल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व व्हीएनआयटी परिसरातही केंद्र सुरू करण्याचा विचार होऊ शकतो.
हॉटेलमध्ये फक्त १५ नागरिक
शहरातील १५हॉटेल चालकांनी माफक दरात संशयित लोकांना ठेवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार नॉन एसी रूम साठी ५०० रुपये, एसी रुमसाठी १ हजार रुपये दर निश्चित करण्यात आले होते. मोठ्या हॉटेलने यासाठी १५०० रुपये दर ठरविले होते .परंतु आजवर या हॉटेलमध्ये फक्त १५ जण वास्तव्यास आहेत. यातील सहा जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते घरी गेले आहेत. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदर सिंह रेणू यांनी सांगितले की, परिस्थिती बघून पुढील तयारी केली जाईल. नाागरिक आल्यानंतर कर्मचाऱ्यांना बोलावले जाईल. याबाबत जिल्हा प्रशासनाल कळविले आहे.
केंद्रनिहाय स्थिती
आमदार निवास- ३०३
वनामती -९७
रविभवन- ४०
लोणारा -१२
सिम्बॉयसिस- ७०
हॉटेल -९
वानाडोंगरी- १२४
एकूण- ६५५