क्वारंटाईन स्टॅम्पमुळे हातावर होताहेत जखमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:19 PM2020-06-13T21:19:54+5:302020-06-13T21:22:09+5:30
विमानतळावरून शहरात आलेल्या प्रवाशांना मारण्यात येत असलेल्या होम क्वारंटाईन स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहे. या तक्रारी गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहे. पीडितांनी यासंदर्भात महापालिका, आरोग्य विभाग व विमानतळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमानतळावरून शहरात आलेल्या प्रवाशांना मारण्यात येत असलेल्या होम क्वारंटाईन स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहे. या तक्रारी गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहे. पीडितांनी यासंदर्भात महापालिका, आरोग्य विभाग व विमानतळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे बाहेर राज्यात, जिल्ह्यात अडकलेले प्रवासी आपापल्या घरी परतत आहे. नागपूर शहरात पुणे, मुंबईसह अन्य राज्यातून मोठ्या संख्येने प्रवासी येत आहे. विमानाद्वारे आलेल्या प्रवाशांना विमानतळावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प मारून त्यांना १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. शुक्रवारी पुण्याहून विमानाने नागपुरात परतलेली परीन वाकडे हिच्या हातावर नागपूर विमानतळावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प मारण्यात आला. अवघ्या काही मिनिटातच तिच्या हाताला जळजळ सुरू झाली आणि तास दीड तासातच स्टॅम्प लावलेल्या त्वचेवर फोड आले. त्वचेला चांगलीच जखम झाली. परीनच्या पूर्वी अशीच घटना ऐश्वर्या निनावे यांच्यासोबत घडली. ऐश्वर्या ८ जून रोजी पुण्यावरून नागपूरला परतली. तिलाही स्टॅम्प मारला. तिच्याही हाताला अशीच जखम झाली. त्यापूर्वी हा प्रकार स्नेहा मून यांच्यासोबत झाला. परीन वाकडे यांनी यासंदर्भात मनपाकडे तक्रार केली. तर त्यांनी सांगितले की अशा तक्रारी अनेकांकडून आल्या आहे. यासंदर्भात आम्हीही वरिष्ठांना तक्रार केली आहे. ऐश्वर्यानेही यासंदर्भात विमानतळ प्रशासनाला मेल केला होता. तर त्यांना कळविण्यात आले की, आम्ही स्टॅम्पसाठी वापरण्यात आलेली शाई बदलविली आहे. मात्र त्यानंतरही स्टॅम्पची रिअॅक्शन होतच आहे.
दर्जाहीन शाईमुळे होताहेत जखमा
स्टॅम्पची शाई दर्जाहीन असल्यामुळे त्याचे इन्फेक्शन होऊन जखम होत आहे. शाईचा वापर करताना त्याची क्वॉलिटी व इतर गोष्टी तपासूनच स्टॅम्प मारावा, असे पीडितांचे म्हणणे आहे.