'मी जिवंत आहे' प्रमाणपत्रासाठी नागपुरात ज्येष्ठांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 08:50 PM2019-11-04T20:50:52+5:302019-11-04T20:52:19+5:30
सध्या उमरेड रोडवरील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयापुढे पहाटेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहे. ‘मी जिवंत आहे’ हे प्रमाणपत्र कार्यालयातून मिळते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लवकर टोकन मिळावे म्हणून पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिक कार्यालयाच्या गेटबाहेरून रांगेत लागतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या उमरेड रोडवरील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयापुढे पहाटेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहे. ‘मी जिवंत आहे’ हे प्रमाणपत्र कार्यालयातून मिळते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लवकर टोकन मिळावे म्हणून पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिक कार्यालयाच्या गेटबाहेरून रांगेत लागतात. टोकन मिळविण्यासाठी तीन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात भविष्य निर्वाह निधीची पेन्शन मिळत असलेल्या सेवानिवृत्त कामगारांना ‘मी जिवंत आहे’ हे प्रमाणपत्र बँकेत सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून मिळते. उमेरड रोडवरील भविष्य निर्वाह निधीचे कार्यालय हे विभागीय कार्यालय आहे. येथे आपले प्रमाणपत्र बनवून घेण्यासाठी नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातून सेवानिवृत्त कर्मचारी येतात. प्रमाणपत्राचे काम लवकर व्हावे, या अपेक्षेतून पहाटेपासूनच भविष्य निधीच्या कार्यालयापुढे रांगा लावतात. सोमवारी लोकमत प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली. भविष्य निधी कार्यालयाचे गेट बंद होते. गेटच्या बाहेरून ज्येष्ठांची लांब रांग लागली होती. बसण्याची सोय नव्हती, पिण्याचे पाणी नव्हते. कार्यालय सुरू झाल्यानंतर सुरक्षा रक्षक या कर्मचाऱ्यांना टोकन वाटतो. त्यामुळे पहाटेपासून रांगेत लागलेले ज्येष्ठ नागरिक सकाळी ९.३० वाजेपर्यंत कार्यालयापुढे ताटकळत बसले होते. ‘साठी’ गाठलेले यातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असतात. काहींना नीट चालताही येत नव्हते, असेही ज्येष्ठ रांगेत उभे होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व सुरक्षा रक्षकांमध्ये तू तू मै मै सुद्धा झाली. पण सुरक्षा रक्षकाने कार्यालय सुरू झाल्यानंतर ज्येष्ठांना टोकन वाटले, त्यानंतरच त्यांना कार्यालयात प्रवेश मिळाला.
टोकन वाटण्याचा आम्हाला अधिकार नाही
लोकमत प्रतिनिधीने सुरक्षा रक्षकाला टोकन वाटून टाका आणि कार्यालयीन वेळेत त्यांना यायला सांगा, अशी विनंती केली. परंतु सुरक्षा रक्षकांनी आम्हाला टोकन वाटण्याचा अधिकार नाही, कार्यालय सुरू झाल्यानंतर, अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरच आम्ही टोकन वाटू असे सांगितले. बसण्याची सोय नसल्यामुळे कार्यालयाच्या आतील अभ्यागत कक्षात तरी त्यांना बसवा, असाही आग्रह केला. पण तेही अधिकार आम्हाला नसल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्यामुळे कार्यालयाच्या बंद गेटपुढे ज्येष्ठ नागरिक कार्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे होते.
कार्यालय परिसरात करावी बसण्याची सोय
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा परिसर मोठा आहे. अभ्यागतांना बसण्यासाठी सोयसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयाच्या गेटपुढे रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयातील अभ्यागत कक्षात बसण्याची सोय करावी, अशी अपेक्षासुद्धा काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
दरवर्षी ज्येष्ठांना हा त्रास होतो
जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ज्येष्ठांना बँकेत जमा करावे लागते. नाहीतर पेन्शन मिळत नाही. मुळात बँकेतच हे प्रमाणपत्र उपलब्ध व्हायला हवे. तसा अधिकार बँकेला दिलेलाही आहे. पण बँका गांभीर्याने घेत नाही. समितीच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठांना त्रास होणार नाही, यासाठी प्रमाणपत्राची जबाबदारी आम्हाला द्यावी, अशी मागणी करतो आहे. गडचिरोलीपासून पेन्शनर येथे येतात. रांगा लावतात, पाण्याची सोय नाही, बसण्याची व्यवस्था नाही, बराच त्रास होतो. दरवर्षीची ही परिस्थिती कार्यालयालाही माहीत आहे, पण नाईलाज आहे.
प्रकाश पाठक, महासचिव, ईपी-९५ समन्वय समिती