सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह दुर्दैवी; अनुराधा प्रभुदेसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:36 AM2019-03-18T11:36:53+5:302019-03-18T11:37:17+5:30
सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी आहे, असे मत ‘लक्ष्य फाऊंडेशन’च्या संस्थापिका व अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशाचे सैनिक सहिष्णू आहेत. मात्र ते जे वचन देतात ते पाळतातच. आपल्या जीवावर उदार होऊन ते देशाचे रक्षण करतात. मात्र देशात त्यांच्याच शौर्यावरुन राजकारण होते. सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी आहे, असे मत ‘लक्ष्य फाऊंडेशन’च्या संस्थापिका व अध्यक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. ‘मंथन’तर्फे रविवारी आयोजित व्याख्यानादरम्यान त्या बोलत होत्या.
चिटणवीस केंद्र येथे आयोजित या कार्यक्रमाला एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) सूर्यकांत चाफेकर हे उपस्थित होते. आपल्या देशात सैनिकांना हवी तशी ओळख मिळालेली नाही. ९९ टक्के चर्चांचे विषय तर क्रिकेट आणि सिनेमाशी निगडित असतात. देशवासीयांना कारगील युद्धाचा पहिला ‘हिरो’ असलेल्या कॅप्टन सौरभ कालिया याचे नावदेखील माहीत नाही.
पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परत आलेले फायटर पायलट के.नचिकेता मला म्हणाले होते की देशात आम्हाला कुणी ओळखत नाहीत. त्यांचे हे शब्द कानांमध्ये गरम तेल ओतणारे होते. शूर जवानांची नावे समोर येत नाहीत ही शोकांकिता आहे, असे प्रभुदेसाई म्हणाल्या.
सैनिकासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. ते आयुष्य पणाला लावतात. मात्र त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण कधीही सैनिकांचे काम जवळून न पाहिलेले लोक करताना दिसून येतात. देशात लोकशाही आहे व लोक काहीही माहिती नसताना वाट्टेल ते बोलतात. संविधानाने दिलेले स्वातंत्र्य उपभोगत असताना नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीचा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडतो. लोकांसाठी स्वातंत्र्य मोफत असते. मात्र त्याची किंमत सैनिक चुकवत असतो. लोक स्वत:च्या स्वार्थासाठी सैनिकांवर टीकाटिप्पणी करतात हे चुकीचे आहे.
तरुण पिढीने जागरुक होण्याची गरज आहे. जर तरुणाईने सैनिकांना समजून घेतले व जबाबदाऱ्या पार पाडल्या तर देशातील अनेक समस्या दूर होतील, असे त्यांनी प्रतिपादन केले.
आपल्या देशातील तरुण बदल घडवून आणू शकतात. त्यांनी आपली ऊर्जा सकारात्मक कामात लावावी, असे आवाहन सूर्यकांत चाफेकर यांनी केले. यावेळी अनुराधा प्रभुदेसाई यांनी कारगिल युद्ध, देशाच्या सीमा, तेथील परिस्थिती, जवानांची कामगिरी इत्यादींवर प्रकाश टाकला. अंकिता देशकर यांनी संचालन केले.