महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत कुचराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:31 AM2018-03-14T10:31:44+5:302018-03-14T10:31:54+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलवून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना करण्यात आले. मात्र वर्ष होत असतानाही नव्या नावावर जुन्याच आजारांवरील औषधोपचार सुरू आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गोरगरीब रुग्णांसाठी आणखी फायद्याची व्हावी यासाठी योजनेचे नाव बदलवून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना करण्यात आले. यात विमा संरक्षणाची रक्कम दोन लाख होणार होती. ११०० आजारांचा समावेश होणार होता. कर्करोग, बालकांवरील उपचार, हिप जॉर्इंट, नी रिप्लेसमेंट, सिकलसेल, अॅनिमिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू उपचारांचा समावेश करण्यात येणार होता, मात्र वर्ष होत असतानाही नव्या नावावर जुन्याच आजारांवरील औषधोपचार सुरू आहे. गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देते कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेत ३० प्रमुख शस्त्रक्रियांसह तब्बल ९७१ आजारांचा समावेश केला. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष १ लाख ५० हजार रुपयांची विमा संरक्षणाची रक्कम दिली जात होती. या योजनेची मुदत १ आॅक्टोबर २०१६ रोजी संपणार होती. तत्पूर्वी नव्या सरकारने या योजनेचे नाव बदलविण्याचा व गोरगरीब रुग्णाभिमुख ही योजना करण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणाही केली. यात विमा संरक्षणाची रक्कम ५० हजाराने वाढवून ती दोन लाख करण्याची व जुन्या योजनेतील ज्या आजाराचे फार कमी रुग्ण आले ते कमी करून नव्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११०० आजारांचा या योजनेत समावेश होणार होता.
परंतु आॅक्टोबर २०१६ पासून ते मार्च २०१७ पर्यंत जुन्याच नावाने ही योजना सुरू ठवेली. १ एप्रिल २०१७ पासून जुन्या योजनेच्या नावात बदल करून ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ नाव दिले. परंतु योजनेत नव्या आजारांचा समावेश व विमा संरक्षणाच्या रकमेत एक रुपयांचीही वाढ केली नाही. विशेष म्हणजे, एप्रिल २०१७ पासून ते आतापर्यंत या योजनेला पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली, परंतु नाव सोडून कुठलाही बदल झाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये रोषव्याप्त आहे.
‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’पासून रुग्ण वंचित
जुन्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ‘नी रिप्लेसमेंट’ आणि ‘हिप रिप्लेसमेंट’चा समावेश नव्हता. नागपूर विभागात या शस्त्रक्रियेसाठी सिकलसेलचे २००वर रुग्ण प्रतीक्षेत होते. यासाठी त्यांनी आंदोलन केले. परिणामी, नव्या योजनेत या दोन्ही उपचारांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अंमलबजावणी झाली नाही. परिणामी, सिकलसेलचे रुग्ण या प्रत्यारोपणापासून अद्यापही वंचित आहेत.
लहान मुले व वयोवृद्धांनाही बसला फटका
गेल्या वर्षी नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे ७९० रुग्ण व १७८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. तर शहरात डेंग्यूचे २३० रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. याचा मोठा आर्थिक फटका रुग्णांना बसला होता. यामुळे नव्या योजनेत या दोन्ही आजारासोबतच कर्करोग, बालकांवरील व वृद्धांवरील उपचारांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जुनीच योजना सुरू असल्याने याचा फटका लहान मुले व वयोवृद्धांनाही बसला.
आश्रम शाळेतील विद्यार्थी, पत्रकारही उपेक्षित
नव्या योजनेत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब आदी घटकांचा समावेश होणार होता. परंतु नवी योजना लागूच झाली नसल्याने हेही घटक गेल्या वर्षभरापासून उपेक्षित आहेत.