नागपुरात ट्रायल रन मेट्रोतून सिंधू व गोपीचंदचा प्रवास कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:28 PM2017-11-09T12:28:21+5:302017-11-09T12:28:43+5:30
आंतरराष्ट्रीय स्तराचे बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांच्यासह खेळाडूंना अखेर ट्रायल रन मेट्रोतून कसे नेले? या प्रश्नांचे उत्तर नागरिक विचारत आहेत.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तराचे बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांच्यासह अन्य बॅडमिंटन खेळाडू मंगळवारी मेट्रो रेल्वेने साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून मिहान डेपोमध्ये पोहोचले. ट्रायल रनवर धावणाऱ्या या रेल्वेतून पाच कि़मी.चा प्रवास करताना एखादी दुर्दैवी घटना घडली असती तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरले असते आणि महामेट्रो देशातील या महान खेळाडूंना अखेर ट्रायल रन मेट्रोतून कसे नेले? या प्रश्नांचे उत्तर नागरिक विचारत आहेत.
नागपुरात आयोजित ८२ व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपकरिता आलेले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद, किदकम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप आणि साई प्रणीत मंगळवारी मेट्रोच्या मिहान डेपोमध्ये पोहोचले होते. त्यासाठी त्यांनी साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वेने पाच कि़मी.चा प्रवास केला होता.
नागपुरात मेट्रो रेल्वेचे सध्या ट्रायल रन सुरू आहे. रिसर्च डेव्हलपमेंट अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशनची(आरडीएसओ)चमू यावर लक्ष ठेवून आहे. आरडीएसओकडून हिरवी झेंडी आणि कमिश्नर आॅफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची(सीएमआरएस)मंजुरी मिळाल्यानंतरच मेट्रो व्यावसायिकरीत्या धावणार आहे. मेट्रोची रेल्वे, अॅटग्रेड सेक्शन अर्थात ५.६ कि़मी.चा ट्रॅक, वीज पुरवठा व्यवस्था नवीन आहे आणि त्याची प्रत्येक स्तरावर तपासणी सुरू आहे. अशास्थितीत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या बॅडमिंटन खेळाडूंना या नवीन ट्रॅकवर नवीन मेट्रो रेल्वेमध्ये प्रवास करून महामेट्रोने त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन तर केले नाही ना? हा प्रश्न जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे.
याप्रकरणी मत जाणून घेण्यासाठी महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मेट्रो रेल्वेची हैदराबाद येथे पूर्वीच तपासणी झाली असून आवश्यक प्रमाणपत्र मिळाले आहे. नागपुरात आरडीएसओचा ट्रायल रन पूर्ण झाला आहे. खेळाडूंना ८० कि़मी. प्रति तास वेगाऐवजी १० ते १५ कि़मी. प्रति तास वेगाने मेट्रोने नेण्यात आले. यादरम्यान मेट्रोची सक्षम चमू सोबत होती.
होर्डिंग ‘जैसे थे’, नव्याने लागले
मेट्रो पिलर्सचे विद्रूपीकरण अद्याप थांबलेले नाही. महामेट्रोने या पिलर्सवर सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे होर्डिंग लावले. हे होर्डिंग अजूनही हटलेले नाही तर त्याच्या बाजूला स्थानिक आमदाराने आपले होर्डिंग नव्याने लावले आहेत. अजनी चौक परिसरात मेट्रो पिलर्सवर हे होर्डिंग झळकत आहेत. विद्यार्थी दिवसाची शुभेच्छा देणाऱ्या या होर्डिंगवर आमदाराचे नाव नमूद आहे.