हत्येच्या गुन्ह्यावर प्रश्नचिन्ह, जन्मठेपेची शिक्षा निलंबित
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: December 29, 2023 07:14 PM2023-12-29T19:14:18+5:302023-12-29T19:14:50+5:30
आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा निलंबित करून त्याला सशर्त जामीन मंजूर केला.
नागपूर : संबंधित गुन्हा हत्येच्या व्याख्येत मोडतो किंवा नाही, असा प्रश्न प्राथमिक तथ्यांवरून उपस्थित झाल्यामुळे आणि इतर काही बाबी लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा निलंबित करून त्याला सशर्त जामीन मंजूर केला. हे प्रकरण वाशिम जिल्ह्यातील आहे.
सागर सुरेश गव्हाणे, असे आरोपीचे नाव असून तो अनसिंग येथील रहिवासी आहे. मृताचे नाव संजय केशव काळे होते. १५ जानेवारी २०१९ रोजी गव्हाणेचा काळेसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. दरम्यान, गव्हाणेने दीड किलोचा दगड काळेच्या डोक्याला मारला. त्यानंतर तो उपचारादरम्यान मरण पावला. ७ एप्रिल २०२१ रोजी सत्र न्यायालयाने गव्हाणेला हत्येच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध गव्हाणेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. तसेच, त्याने हे अपील निकाली निघेपर्यंत जामीन मागितला होता. गव्हाणेतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.