१८,५९७ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:11 AM2021-03-09T04:11:08+5:302021-03-09T04:11:08+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी शासनाने जिल्हा परिषद व खासगी ...
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी शासनाने जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांची निर्मिती करून त्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच विविध शासकीय याेजनांची याेग्य अंमलबजावणी करून शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी पंचायत समितीअंतर्गत शिक्षण विभागाचीही निर्मिती केली. मात्र, या विभागातील विविध महत्त्वाची पदे रिक्त असल्याने केवळ एका अधिकाऱ्याला रामटेक तालुक्यातील शिक्षणाचा डाेलारा सांभाळावा लागत आहे. शासनाच्या या उदासीन धाेरणामुळे तालुक्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या एकूण १८,५९७ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रामटेक तालुक्यातील बहुतांश भाग दुर्गम व आदिवासीबहुल आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची व हलाखीची असल्याने त्यांच्या मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी शासकीय शाळांवाचून गत्यंतर नाही. त्यामुळे तालुक्यातील १७० शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या १४० शाळांमधून ८,९९३ तर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ३९ शाळांमधून ९,६०४ विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत. एकूण १२ केंद्रांमध्ये विभागण्यात आलेल्या शाळा विचारात घेता तालुक्यातील शिक्षणाचा व्याप लक्षात येताे.
मध्यंतरी आदर्श शिक्षक निवडीचे प्रस्ताव नागपूर येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला पाठविण्यात आले. त्यात निवड करण्यासाठी जिल्हा निवड समिती असते. यात नियमाप्रमाणे विभागीय चाैकशी असणारे शिक्षक अपात्र ठरतात. पण या चाैकशीचे कागदपत्र पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे नसतात. त्यामुळे ही जबाबदारी जिल्हा निवड समितीची असते. यालाही गटशिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात असल्याने वादळ निर्माण झाले हाेते.
रामटेक पंचायत समितीमध्ये शिक्षणाच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करून, याेग्य निर्णय घेण्यापेक्षा इतर विषयांची अधिक चर्चा हाेत असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शिक्षकांच्या विविध संघटनांही आक्रमक हाेताना दिसून येत नाही. या प्रकारामुळे एकीकडे गटशिक्षणाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून, दुसरीकडे ग्रामीण भागातील शिक्षकांचा विकास खुंटल्यागत झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील रिक्त पदे भरणे गरजेचे आहे, अशी मागणी शिक्षण क्षेेत्रातील जाणकार व्यक्तींनी केली अहे.
...
रिक्त पदांचे ग्रहण
रामटेक तालुक्यातील सर्व शाळा १२ केंद्रांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याला १२ केंद्र प्रमुखांची गरज असताना केंद्र प्रमुखांची चार पदे रिक्त आहेत. एवढेच नव्हे तर १३ शिक्षकांची कमतरता असून, सात विषय शिक्षकांची तर दाेन मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. शिवाय, वरिष्ठ लिपिकाचेही पद रिक्त असून, गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने या एकट्याच तालुक्याच्या शिक्षणाचा डाेलारा सांभाळत आहेत.
...
पगाराची समस्या ऐरणीवर
तालुक्याच्या ठिकाणापासून करवाही हे गाव ५० किमी आहे. या सर्वांच्या शैक्षणिक विकासासाठी केवळ एक अधिकारी (गटशिक्षणाधिकारी) आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या अनेक समस्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या पगाराचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांचे पगार दर महिन्याच्या १ तारखेला हाेणे अपेक्षित असताना, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पगार बिले तयार करायला विलंब हाेत असल्याने पगारही उशिरा हाेतात.