कुलगुरूंच्या विशेष ‘टीम’वर प्रश्नचिन्ह

By admin | Published: November 3, 2015 03:28 AM2015-11-03T03:28:14+5:302015-11-03T03:28:14+5:30

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी राज्यभरातील विद्यापीठातील तज्ज्ञांची एकदिवसीय

Question marks on the special 'team' of the Vice Chancellor | कुलगुरूंच्या विशेष ‘टीम’वर प्रश्नचिन्ह

कुलगुरूंच्या विशेष ‘टीम’वर प्रश्नचिन्ह

Next

नागपूर : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी राज्यभरातील विद्यापीठातील तज्ज्ञांची एकदिवसीय राज्यस्तरीय बैठक मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील २० जणांची ‘टीम’ सहभागी होणार आहे. परंतु या ‘टीम’ची निवड कशाच्या आधारावर करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनुभवी शिक्षणतज्ज्ञांना अंतर्गत राजकारणातून डावलल्याचा आरोप माजी प्राधिकरण सदस्यांनी केला आहे.
ही परिषद ३ नोव्हेंबर रोजी चर्चगेट येथील सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ‘यूजीसी’चे उपाध्यक्ष यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगजगताचे प्रतिनिधी, शिक्षणजगताशी संबंधित सर्व घटकांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. यासाठी इतर विद्यापीठांप्रमाणे नागपूर विद्यापीठानेदेखील २० जणांची ‘टीम’ निवडली. यात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. डी.के. अग्रवाल यांच्यासह विद्यापीठाचे विविध विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापक, विभागप्रमुखांचा समावेश आहे.
परंतु ही निवड करताना कुलगुरूंनी अनुभवी शिक्षणतज्ज्ञांना डावलून एका विशिष्ट गटातील विश्वासू व्यक्तींना यात संधी दिली आहे, असा आरोप करण्यात येत आहे. जर असे नसेल तर कुठल्या निकषांवर ही निवड करण्यात आली, असा प्रश्नदेखील विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे. या ‘टीम’ची निवड तसेच दौरा याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी ही ‘टीम’ दुरंतो एक्स्प्रेसने मुंबईसाठी रवाना झाली. (प्रतिनिधी)

कुठे चालले नागपूर विद्यापीठ?
या प्रकाराबद्दल व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. बबन तायवाडे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. शैक्षणिक धोरणासंदर्भात अनुभवी तज्ज्ञ जास्त सखोल मुद्दे मांडू शकतात. परंतु कुलगुरूंच्या या ‘टीम’मध्ये बहुतांश जणांना फारसा अनुभव नाही. अनेक जण तर विद्यापीठाच्या एकाही प्राधिकरणांचे कधीही सदस्यदेखील राहिलेले नाहीत व त्यांना विद्यापीठ कायद्याचेदेखील ज्ञान नाही. ज्यांनी गेली २० वर्षे विद्यापीठ गाजवले अशा तज्ज्ञांना संधी न देता जवळील लोकांना घेऊन जाणे हा प्रकार अयोग्य आहे. विद्यापीठाच्या पैशाने सहल करण्याचा हा प्रकार असून कुठे चालले नागपूर विद्यापीठ, असा सवाल त्यांनी केला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेला दिले महत्त्व
कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. या परिषदेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणातील प्रस्तावित २० विषयांवर गटश: चर्चा करण्यात येणार आहे. या विषयांत ज्यांचे संशोधन आहे किंवा जे प्रत्यक्ष यातील विषय शिकवितात त्यांची निवड करण्यात आली. त्यांना प्राधिकरणांचा अनुभव नसला तरी शैक्षणिक क्षेत्रात त्यांना सखोल ज्ञान आहे. त्यांची पात्रता लक्षात घेऊनच हे स्थान देण्यात आले, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

Web Title: Question marks on the special 'team' of the Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.