शिवभोजनासाठी सकाळपासून रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:39+5:302021-04-28T04:08:39+5:30
भिवापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच लॉकडाऊनचा पुकारा झाला. रोजगार ठप्प पडले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांसाठी शासनाने शिवभोजन नि:शुल्क केले. ...
भिवापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच लॉकडाऊनचा पुकारा झाला. रोजगार ठप्प पडले. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांसाठी शासनाने शिवभोजन नि:शुल्क केले. ही एकवेळची थाळी मिळविण्यासाठी शिवभोजन केंद्रासमोर सकाळपासून रांग लागत आहे. ८ वर्षाच्या चिमुकल्यांपासून काठीचा आधार घेत वृध्दही रांगेत लागले आहेत. रस्त्यावर मोलमजुरीचे काम करणाऱ्या गरजू मजुरांना हक्काचे एकवेळ जेवण कमी दरात मिळावे यासाठी शासनाने शिवभोजन थाळी ही १० रुपयात जेवण देणारी योजना अमलात आणली. शहरात स्वाद भोजनालय व वक्रतुंड अशा दोन चालकांना शिवभोजन थाळीचे कंत्राट मिळालेले आहे. पूर्वी १० रुपयात ही थाळी दिल्या जायची. मात्र लॉकडाऊन जाहीर करताच एप्रिल महिन्यापासून शिवभोजनची थाळी नि:शुल्क देण्याची घोषणा शासनाने केली आहे. लॉकडाऊनच्या या दिवसात सर्व व्यवसाय व व्यवहार ठप्प असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी ही थाळी ‘अन्नपूर्णा’ ठरली आहे. सध्या शासनाच्या निर्देशानुसार शिवभोजन केंद्रात बैठक व्यवस्था बंद असून सकाळी ८ ते दुपारी ११ वाजतापर्यंत पार्सल सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही थाळी मिळविण्यासाठी सकाळी ६ वाजतापासून शिवभोजन केंद्राच्या समोर गरजूंच्या रांगा लागत आहे. १२५ थाळींचे नियोजन शिवभोजनचे वितरण दिवसाला एक वेळ होत आहे. त्यात शासनाच्या निर्देशाप्रमाणे दिवसाला १२७ थाळींचे नियोजन आहे. मात्र रांगेत डबा घेऊन कधी १४० ते १५० जण उभे असतात. अशावेळी त्यांना खाली हाताने परत पाठविणे योग्य ठरत नाही. त्यामुळे नियोजन नसले तरी अन्नदान या भावनेतून दोन्ही शिवभोजन चालक प्रत्येकाला पार्सल देण्याचा प्रयत्न करत आहे. ही थाळी प्रत्येक गरजूला मिळावी हा उद्देश असला तरी काही सुखी संपन्न लोकही त्याचा लाभ घेत आहे. त्यामुळे खरे गरजू मात्र वंचित राहत असल्याचा सूरही अभिव्यक्त होत आहे.