लसीकरण केंद्रांवर रांगा, नागरिक गोंधळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:19+5:302021-05-10T04:08:19+5:30
मागणीनुसार पुरवठा नसल्याने नागरिक त्रस्त : प्रशासन वस्तुस्थिती स्पष्ट का करत नाही? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
मागणीनुसार पुरवठा नसल्याने नागरिक त्रस्त : प्रशासन वस्तुस्थिती स्पष्ट का करत नाही?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नागपूर शहरात लसीकरणाने गती पकडली होती. १६ ते १७ हजारापर्यंत हा आकडा गेला होता. मात्र मागणीनुसार लस उपलब्ध होत नसल्याने ११ एप्रिलपासून शहरातील लसीकरण मंदावले. दररोज ७ ते ८ हजार लसीकरण होत होते. मे महिन्यात पहिल्या आठवडयात हा आकडा पुन्हा खाली आला. शुक्रवारी १८४५, तर शनिवारी २६९० डोस देण्यात आले. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. दुसरीकडे लसीकरण केंद्रांवर लोकांच्या रांगा लागत आहेत. केंद्रावर किती डोस उपलब्ध आहेत, याची माहिती डॅश बोर्डवर दिली जात नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. अनेकांना रांगेत राहूनही लस मिळत नाही. यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.
नागरिकांना सुविधा व्हावी, यासाठी मनपा प्रशासनाने शहरात १८९ लसीकरण केंद्रे सुरू केली होती. यात पुन्हा चमकोगिरी म्हणून अनेक नगरसेवकांनी लसीकरण केंद्र सुरू केले. शहरात ११० शासकीय, तर ७९ खासगी केंद्रांचा समावेश होता. कोविशिल्डची १८५, तर कोव्हॅक्सिनची ५ केंद्रे होती. मात्र मागणीनुसार लस पुरवठा होत नसल्याने मागील काही दिवसांपासून खासगी केंद्रे बंद आहेत. ९६ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यात काही केंद्रांवर ५० ते १०० डोस उपलब्ध होतात. मात्र लसीकरणासाठी १५० ते २०० जणांची रांग असते. रविवारी रघुजीनगर येथील विमा रुग्णालयातील केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु पुरेसा लस साठा नसल्याने अनेकांना परत जावे लागले. अशीच परिस्थिती अन्य केंद्रांवर होती. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील केंद्रावर शनिवार व रविवारी लसीकरण बंद असल्याचा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे इच्छुकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता आला नाही.
पहिला डोस घेऊन सात-आठ आठवड्यांचा कालावधी संपलेल्यांची, दुसरा डोस मिळावा यासाठी भटकंती सुरू आहे. अनेकजण लसीकरण केंद्रावर चौकशीसाठी येतात. परंतु लस कधी उपलब्ध होणार याबाबत केंद्रावरील कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याने लसीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर दुसरा डोस मिळेल, असे सांगितले जाते. पण लस कधी उपलब्ध होईल, याबाबत शाश्वती नसल्याने मनपा प्रशासनाचीही कोंडी झाली आहे.
...
लसीकरण
एकूण केंद्रे -१८९
शासकीय -११०
खासगी -७९
कोविशिल्ड -१८५
कोव्हॅक्सिन -५
,...
नागपूर शहरातील लसीकरण (७ मेपर्यंत)
पहिला डोस
आरोग्यसेवक - ४३,९६५
फ्रंटलाईन वर्कर - ४८९१५
१८ वर्षांवरील - ६३८९
४५ वर्षांवरील - १,०७०८६
४५ वर्षांवरील आजारी - ७७२६०
६० वर्षांवरील - १,६३३१०
एकूण - ४,४६९२६
...
दुसरा डोस
आरोग्यसेवक - २११३७
फ्रंटलाईन वर्कर - १४०९२
४५ वर्षांवरील - १६४४३
४५ वर्षांवरील आजारी - १२१९७
६० वर्षांवरील - ५३४५३
दुसरा डोस एकूण-११७३२२
एकूण लसीकरण - ५,६४२४७
....