आता अपघाताची मिळणार त्वरित माहिती
By admin | Published: March 29, 2017 02:41 AM2017-03-29T02:41:10+5:302017-03-29T02:41:10+5:30
शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात.
विनाहेल्मेट गाडीही होणार नाही ‘स्टार्ट’ : सहा विद्यार्थिनींनी तयार केले ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’
सुमेध वाघमारे नागपूर
शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही वाहनचालक याला गंभीरतेने घेत नाही. यातच अपघात झाल्यास उशिरा मदत मिळत असल्याने मृत्यूचा धोकाही वाढतो. याची दखल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सहा विद्यार्थिनींनी घेतली. त्यांनी तयार केलेल्या ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’मुळे हेल्मेटशिवाय गाडी तर स्टार्ट होणारच नाही, शिवाय अपघात झाल्यास याची माहिती घरच्यांना मिळेल. जखमीला तत्काळ मदत पोहचविणे शक्य होईल.
संशोधनाच्या क्षेत्रात केव्हा कसा, आणि कोणता शोध लागेल आणि नवीन काय हाती येईल, याचा नेम नाही. असाच एक प्रयोग प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेज, डिगडोह हिंगणाच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन’च्या अंतिम वर्षाच्या मौसम, अदिती वराडे, नेहा गजभिये, तक्षशीला हाडके, मिनाक्षी खरवडे आणि पारुल नगरकर या सहा विद्यार्थिनींनी केला.
दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’ हे नवखे उपकरण तयार केले. याचे प्रात्याक्षिक नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांना दिले. हे उपकरण सर्व दुचाकी चालकांच्या फायद्याचे असल्याचे आरटीओचे प्रमाणपत्रही त्यांना मिळणार आहे. या ‘हेल्मेट बँड’चे अनेक फायदे आहेत. यात वाहनचालकाला सुरक्षा तर मिळेल सोबतच वाहतुकीचे नियम पाळता येईल. आपली काळजी घेणाऱ्यांना आपण कुठे आहात याची माहिती मिळेल, वाहन चोरी टळेल व अपघाताची त्वरित माहिती आप्तांना मिळेल.
अपघाताचा मोबाईलवर येईल मॅसेज
‘इंटेलिजेन्ट हेल्मेट बँड’मध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकाचे ‘लोकेशन’ त्याने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘जीएसएम’ मार्फत पोहचविल्या जाते. यामुळे वाहनचालकाचे ठिकाण (लोकेशन) कळते. यातच अपघात झाल्यास याची माहितीही संबंधित मोबाईलवर येते. परिणामी, जखमीला तत्काळ मदत मिळू शकेल. शिवाय, अपघातग्रस्त वाहनातून ‘बझर’ वाजत राहील व ‘एलईडी’ लाईट लागणार असल्याने रहदारी करणाऱ्यांचे लक्षही वेधून घेईल. (प्रतिनिधी)