मंदिर परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवा
By admin | Published: April 16, 2017 01:50 AM2017-04-16T01:50:58+5:302017-04-16T01:50:58+5:30
शहरातील आग्याराम देवीच्या १.१४ एकर जागेवर असलेले अतिक्रमण त्वरित हटविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.
आग्याराम देवी मंदिर : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश
नागपूर : शहरातील आग्याराम देवीच्या १.१४ एकर जागेवर असलेले अतिक्रमण त्वरित हटविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.
मंदिराच्या एकूण ६.८६ एकर जागेचा वाद पालकमंत्र्यांसमोर आला. मंदिराचे व्यवस्थापन म्हणते ही जागा मंदिराची आहे. पण काही जण म्हणतात जागा आमची आहे. मंत्रालयातून यापूर्वी निघालेल्या आदेशानुसार ही जागा मंदिराच्या ट्रस्टची आहे, असा दावा मंदिराच्या विश्वस्तांनी केला आहे. असे असतानाही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. ६.८६ एकर जागा मंदिराच्या व्यवस्थापनाच्या नावाने नोंद करावी, अशी मागणी विश्वस्तांची होती. ५५/५४ च्या अभिलेखानुसार ही जागा कोठारी व नासुप्रची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रेकॉर्डवर आग्याराम देवीचे नाव व ताबा दुसऱ्यांचा असल्याकडेही विश्वस्तांनी लक्ष वेधले. ज्यांच्या नावाने ही मूळ जागा होती ते सध्या हयात नाहीत. तिघांनी या जागेवर अतिक्रमण केल्याचेही पालकमंत्र्यांना सांगण्यात आले.
विश्वस्तांनी या संदर्भात नासुप्रकडे कागदपत्रांची मागणी केली असता नासुप्रतून फाईलच गायब झाल्याचे सांगितले, तर जिल्हाधिकारी कार्यालयही या जागेसंदर्भातील कागदपत्रे दाखवीत नसल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली. हा जागेचा वाद न्यायालयातच सुटू शकतो. आधी मंदिराच्या १.१४ एकर जागेवरील अतिक्रमण हटवून उर्वरित जागेसाठी विश्वस्त न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)