वेश्यावृत्ती सोडा, पाहिजे तो रोजगार निवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:53+5:302021-08-22T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तुम्ही वेश्यावृत्ती सोडा. तुम्हाला आवडेल तो रोजगार निवडा. त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती साधन सुविधा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुम्ही वेश्यावृत्ती सोडा. तुम्हाला आवडेल तो रोजगार निवडा. त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती साधन सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन गंगाजमुनातील वारांगनांना अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शनिवारी दिले. यावेळी उपायुक्त लोहित मतानी तसेच विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गंगाजमुनाला बॅरिकेड लावून पोलिसांनी सील केले आहे. येथे वेश्याव्यवसाय चालू द्यायचा नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांच्या या भूमिकेला एकीकडून समर्थन मिळत आहे तर दुसरीकडून जबरदस्त विरोध होत आहे. आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने पोलिसांवरही दडपण आले आहे. वारांगनांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे गंगाजमुनातील स्थिती चिघळण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर, वारांगनांच्या पुनर्वसनासाठी पोलिसांनी नवीन भूमिका घेतली आहे. त्यानुसार, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी यांनी शनिवारी दुपारी महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, राष्ट्रीय एडस् नियंत्रण समिती तसेच अन्य काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गंगाजमुनात वारांगनांची बैठक घेतली. पोलीस तुमच्या विरोधात नाही. तुम्ही वेश्याव्यवसाय सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हा. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार रोजगार आणि साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, अशांना शासकीय योजनेनुसार हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वारांगनांच्या अडचणी आणि व्यथाही त्यांनी यावेळी समजून घेतल्या.
---
त्यांची अवस्था दयनीय
पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून बॅरिकेड लावून वारांगनांची वस्ती सील केली असून, १४४ कलम लावून इकडे फिरकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने ग्राहक फिरकेनासे झाले आहे. त्यामुळे वस्तीतील वारांगनांची अवस्था फारच दयनीय झाली आहे. वस्तीत बहुतांश प्रौढ वारांगना आहेत. कोणताही पर्याय नसल्याने त्या येथे थांबल्या आहेत. पोलिसांच्या भूमिकेमुळे पोट कसे भरायचे, जगायचे कसे, असा केविलवाणा प्रश्न त्या करीत आहेत.
----
रक्षाबंधन, आंदोलन आणि शिबिर
शेकडो कोटींची जागा खाली करून घेण्यासाठी अनेक बिल्डर गंगाजमुनांकडे डोळे वटारून बघत असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर, ही वस्ती खाली होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत दिवंगत जांबुवंतराव धोटे यांच्या कन्या ज्वाला धोटे यांनी रक्षाबंधनच्या दिवशी येथे वारांगनांचे सांकेतिक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे वारांगनांना दुसरा सोयीचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांनी विविध शासकीय योजनांच्या संबंधाने रविवारपासून येथे ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. आवडेल तो रोजगार सुरू करण्यासाठी एकाच ठिकाणाहून वारांगनांना आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी या संबंधाने लोकमतला सांगितले.
----