आर. विमला नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:32 AM2021-07-10T10:32:13+5:302021-07-10T10:33:50+5:30
Nagpur News जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची बदली करण्यात आली आहे. ग्रामोन्नती अभियानाच्या सीईओ आर. विमला यांची नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात उत्तम काम करणारे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ग्रामोन्नती अभियानाच्या सीईओ आर. विमला यांची नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या शनिवारी सकाळी पदभार स्वीकारतील. यासोबतच आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा खत्री यांची नंदूरबार, तर जलज शर्मा यांची धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ठाकरे यांना अद्याप कुठेही नियुक्ती मिळालेली नाही. तसेच खत्री आणि शर्मा यांच्या जागेवरही अद्याप कुणालाही नियुक्ती मिळालेली नाही.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी कोरोना काळात अतिशय उत्तम काम केले. ७ सप्टेंबर २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतानाच ठाकरे यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. पुरेसा वेळ मिळाला नसतानाही ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडली. यानंतर कोरोनाच्या संकट काळात त्यांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. नागपुरात अनियंत्रणात गेलेली कोरोनाची परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुदृढ केली. कोरोना काळात रुग्णालय रुग्णांकडून जास्तीचे बिल वसूल करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या. तेव्हा मनपा प्रशासनाने ऑडिटर नियुक्त केले. याची संपूर्ण व्यवस्था अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांभाळली. त्यांच्यामुळेच अनेक रुग्णांचे बिल कमी झाले.
याशिवाय अन्नपुरवठा विभागाचे सचिव व्ही. बी. पाटील यांची कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली. नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.
आर. विमला यांचे ग्रामोन्नती मिशनमध्ये उल्लेखनीय काम
- नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी राज्य शासनाच्या ग्रामोन्नती मिशनच्या सीईओ म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक विकासासाठी त्यांनी दशसुत्री दिल्या आहेत. ग्रामीण भागात तब्बल २ लाख महिला बचत गट त्यांनी तयार केले आहेत. ३४ जिल्ह्यातील तब्बल ३० लाख कुटुंबांना त्यांनी या बचत गटाच्या माध्यमातून जोडले आहे. यासोबतच २३ हजार युवकांना त्यांनी विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले असून, यापैकी १० हजार युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे.