सना खान हत्याकांडात रब्बूला जामीन नाकारला; सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: October 17, 2023 06:22 PM2023-10-17T18:22:38+5:302023-10-17T18:23:12+5:30
पोलिसांना सना यांच्या मृतदेहाचा अद्याप शोध लागला नाही
नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी रब्बू चाचा उर्फ रविशंकर भगतराम यादव (५५) याचा जामीन अर्ज मंगळवारी फेटाळून लावण्यात आला. सत्र न्यायालयाच्या न्या. एस. एस. नागुर यांनी हा निर्णय दिला.
प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे. त्यामुळे रब्बूला जामीन दिला जाऊ शकत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. रब्बू जबलपूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याला २२ ऑगस्ट २०२३ रोजी अटक करण्यात आली. अमित उर्फ पप्पू साहू हा मुख्य आरोपी आहे. सना खान व अमित साहू एकमेकांना ओळखत होते व सोबत व्यवसाय करीत होते. १ ऑगस्ट २०२३ रोजी सना खान साहूला भेटण्यासाठी जबलपूरला गेल्या होत्या. त्यानंतर त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या आई हिना यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
आरोपींनी सना यांची हत्या केली व त्यांचा मृतदेह हिरन नदीत फेकून पुरावे नष्ट केले, असे हिना यांचे म्हणणे आहे. पोलिसांना सना यांच्या मृतदेहाचा अद्याप शोध लागला नाही. मानकापूर पोलिसांनी साहू व रब्बूसह राजेश सिंग, धर्मेंद्र यादव व कमलेश पटेल यांना अटक केली आहे. या आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३६४, ५०४, ५०६, २०१, ३४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.