रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी विशेष; शांतिनिकेतन शैलीत होणार वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:41 AM2019-08-07T11:41:15+5:302019-08-07T11:43:16+5:30
बंगालमध्ये ‘बाईशे श्राबोण’ अर्थात श्रावणातील २२ तारीख म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने साजरी केली जाते.
प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बंगालमध्ये ‘बाईशे श्राबोण’ अर्थात श्रावणातील २२ तारीख म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने साजरी केली जाते. निसर्गाशी गुरुदेवांचे असलेले भावनिक आणि शास्त्रीय अनुबंधाची स्मृती म्हणून शांतिनिकेतनमध्ये या दिनानिमित्त आगळ्यावेगळ्या शैलीत वृक्षारोपण केले जाते. अगदी त्याच शैलीत प्रथमच नागपुरात वृक्षारोपणाचा सोहळा म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.
कथा, कादंबरी, कविता, नाटक, संगीत, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्प अशा नानाविध साहित्य-कलेचे आयाम घेऊन जगताला भुरळ घालणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथमच बंगालमधील शांतिनिकेतन आणि महाराष्ट्रातील नागपूरचे धागे आणखी घट्ट बांधले जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी नागपुरात राहणाºया बंगाली नव्हे तर एका मराठी महिलेची प्रगाढ इच्छा कारणीभूत ठरली आणि बंगाली बांधवांनी, ती इच्छा उचलून धरत हा सोहळा आयोजित करण्याचा प्रण घेतला. त्या अनुषंगाने नागपूरकरांना वृक्षारोपणाचा हा अद्भूत सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता येणार आहे. रवींद्र संगीताच्या सुरेल स्वरांच्या प्रख्यात गायिका अरुंधती वझलवार-देशमुख यांच्या इच्छेला बंगाली बांधवांनी साथ दिली आहे. इंग्रजी तारखेनुसार ७ ऑगस्ट ही गुरुदेवांची पुण्यतिथी असते. मात्र, बंगाली तिथीनुसार श्रावणातला २२ वा दिवस हा पुण्यतिथीचा दिवस असतो. या तिथीला शांतिनिकेतनतर्फे ‘बाईशे श्राबोण’ असे नामकरण करण्यात आले. यंदा ही तिथी ८ ऑगस्टला येत आहे. त्या अनुषंगाने रविवारचा दिवस बघता बंगाली समाजातर्फे ११ ऑगस्टला दुपारी ४ वाजता सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या लॉनमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
इच्छेला मूर्तरूप येतेय, हीच गुरुदेवांना श्रद्धांजली - अरुंधती देशमुख
माझे वडील प्रा. विद्यासागर वझलवार हे शांतिनिकेतनमध्ये संगीताचे प्राध्यापक असल्याने, मी बालपणापासून ते वयाच्या २३ व्या वर्षीपर्यंत तेथेच होते आणि रवींद्र संगीताचे धडे गिरवीत होते. वैवाहिक कारणाने नागपुरात आल्यानंतर संसारात रमले. काही वर्षांनंतर त्यांनी गुरुदेवांच्या जयंतीला रवींद्र गायनाचे कार्यक्रम सुरू केले. मात्र, शांतिनिकेतनमध्ये ज्याप्रकारे पुण्यतिथी साजरी केली जाते, तशीच नागपुरात आयोजित करण्याची इच्छा होती, असे अरुंधती देशमुख यांनी सांगितले.
पंचमहाभूतांच्या साक्षीने होणार वृक्षारोपण
१९२८ मध्ये श्रावणातल्या पहिल्या दिवशी वृक्षारोपणाचा सोहळा साजरा करण्यास टागोर यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये श्रावणातल्या २२ व्या दिवशी अर्थात ७ ऑगस्ट रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पुढच्या वर्षापासून शांतिनिकेतनने गुरुदेवांच्या स्मृतीला अनुसरून श्रावणातल्या पहिल्या दिवसाचा वृक्षारोपणाचा सोहळा २२ व्या दिवशी अर्थात ‘बाईशे श्रावण’ला करण्याचा निर्धार केला. साधारणत: ही तिथी दरवर्षी मागे-पुढे ७, ८ किंवा ९ ऑगस्ट रोजी येत असते. विशेष म्हणजे, वृक्षारोपणाचा हा सोहळा पंचमहाभूतांच्या प्रतिकात्मक रूपांच्या साक्षीने साजरा केला जातो. रवींद्र संगीताची धून, गायन अन् नृत्याच्या तालात ‘बालतरु (रोपटे)’ घेऊन पालखी काढली जाते. अन् पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाशाच्या रूपात सजवलेल्या पाच मुलांच्या साक्षीने वृक्षारोपणाचा सोहळा पार पडतो. अगदी असाच सोहळा नागपुरात साजरा होणार आहे.