उपराजधानीत 'चाईल्ड पोर्नोग्राफी'चे रॅकेट अनेक वर्षांपासून सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:52+5:302021-07-23T04:06:52+5:30
नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - 'चाईल्ड पोर्नोग्राफी'ची पाळेमुळे अनेक वर्षांपासून नागपूरसह विदर्भात खोलवर रुजली आहेत. गेल्या ...
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - 'चाईल्ड पोर्नोग्राफी'ची पाळेमुळे अनेक वर्षांपासून नागपूरसह विदर्भात खोलवर रुजली आहेत. गेल्या वर्षी या संबंधाने नागपुरातील एक, दोन नव्हे तर तब्बल चार पोलीस ठाण्यात एकाच वेळी गुन्हे दाखल झाले होते. सध्या देशभर खळबळ उडवून देणाऱ्या 'चाईल्ड पोर्नोग्राफी'चे प्रकरण उघड झाल्याने नागपुरातून मध्यभारतात चालविला जाणारा हा गोरखधंदा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. या पार्श्वभूमीवर, दोन वर्षांत दाखल झालेल्या कुण्या गुन्ह्याचा ‘राज कुंद्रा’ रॅकेटशी काही संबंध आहे का, त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सोशल मीडियावर पोर्नोग्राफी आणि त्यातही चाईल्ड पोर्नोग्राफीचा होणारा भडिमार लक्षात घेत सुरक्षा यंत्रणांनी वर्षभरापासून या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रेन', 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो' यांच्या माध्यमातून या प्रकारच्या गुन्हेगारीवर नजर ठेवली जाते. नागपुरातून चाईल्ड पोर्नोग्राफीशी निगडित काही 'व्हिडीओ' फेसबुक आणि यू-ट्युबवर गेल्या वर्षी अपलोड करण्यात आले होते. गणेशपेठ, जरीपटका, सक्करदरा आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हे 'व्हिडीओ' अपलोड करण्यात आल्याचे स्पष्ट होताच 'नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रेन'ने ही माहिती स्थानिक वरिष्ठांना कळविली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या संबंधाने गुन्हे शाखेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी ही चाईल्ड पोर्नोग्राफी नागपुरात शूट करण्यात आल्याचा संशय होता. त्यामुळे त्या संबंधानेही तपास सुरू करण्यात आला होता. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील विषय रेंगाळला. दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेमुळे 'चाईल्ड पोर्नोग्राफी'चा विषय पुन्हा एकदा देश-विदेशात चर्चेला आला आहे. नागपुरातून मध्यभारतात 'चाईल्ड पोर्नोग्राफी'चे रॅकेट अनेक वर्षांपासून चालविले जाते, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. याच रॅकेटच्या माध्यमातून हे व्हिडीओ व्हायरल केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता गेल्या वर्षीच्या गुन्ह्यांची लिंक शोधल्यास ती राज कुंद्रापर्यंत पोहचू शकते, अशी चर्चा संबंधित वर्तुळातून ऐकू येत आहे.
---
दोन वर्षांत ३९ गुन्हे
उपराजधानीत 'चाईल्ड पोर्नोग्राफी'च्या संबंधाने नागपुरातील विविध पोलीस ठाण्यात २०२० मध्ये २१ गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे, यातील एकूण ३१ आरोपींपैकी २० आरोपी अल्पवयीन आहेत तर, यावर्षी जून अखेरपर्यंत १८ गुन्हे दाखल झाले. त्यातील १० आरोपी डिटेक्ट झाले असून, सीताबर्डीतील ४ तसेच गणेशपेठमधील ४ गुन्ह्यांचा तपास रेंगाळला आहे. मात्र, राज कुंद्राची पोर्नोग्राफी आणि हे गुन्हे वेगळे असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.