पेट्रोल पंपावर हेराफेरी
By admin | Published: July 13, 2017 02:33 AM2017-07-13T02:33:39+5:302017-07-13T02:33:39+5:30
पल्सर चीपचा वापर करून ग्राहकांना कमी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपांविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे.
कडबी चौकातील प्रकार :
वैधमापनशास्त्र विभाग व गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पल्सर चीपचा वापर करून ग्राहकांना कमी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपांविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. याअंतर्गत बुधवारी कडबी चौकातील के.एस. लांबा अॅण्ड कंपनीच्या पेट्रोल पंपावर छापा घालून तपासणी करण्यात आली. या वेळी ग्राहकांना कमी पेट्रोल दिले जात असल्याचे उघडकीस आले.
गुन्हे शाखेचे पथक, तेल कंपन्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वैधमापनशास्त्र विभागाच्या चमूने केलेल्या तपासणीत पंपाच्या दोन नोझलमध्ये गडबड असल्याचे स्पष्ट झाले.
यामुळे ग्राहकांना कमी पेट्रोल मिळत होते. याप्रकरणी पंप मालकाला कायदेशीर नोटीस बजावत पाच हजार रुपयांचा दंड भरण्याचे व संबंधित नोझलची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत चालली. पंपाला पल्सर चीप लागली आहे का, याची खातरजमा करण्यासाठी पंपाच्या मशीनची तपासणी करण्यात आली. त्यावेळी नोझलमध्ये गडबड असल्याचे दिसून आले. प्रति पाच लिटर पेट्रोलमागे एका नोझलमध्ये २० मिलीलिटर तर दुसऱ्या नोझलमध्ये १५ मिलीलिटर पेट्रोल कमी दिले जात होते. या गडबडीसाठी पंप मालक करतारसिंह लांबा यांना वजन व मापे अधिनियम, १९७६ अंतर्गत नोटीस देण्यात आली. ही कारवाई वैधमापन विभागचे सहनियंत्रक एच.टी. बोकडे यांच्या पथकाने केली. गुन्हे शाखा पोलिसांकडून मात्र पंप मालकाविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
सहा तास कशाची तपासणी केली?
ही कारवाई दुपारी १२ वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ पर्यंत चालली. जर फक्त पंपाच्या नोझलमध्ये गडबड होती तर तब्बल सहा तास नेमकी कशाची तपासणी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पंपावरील गंभीर प्रकार दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशीही शंका निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या नुकसानीचे काय?
कडबी चौकातील पेट्रोल पंपावर धाड घालण्यात आल्यामुळे तेथे होणाऱ्या पेट्रोल लुटीचा पर्दाफाश झाला. मात्र, नेमके किती दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता, हे सांगणे कठीण आहे. या प्रकारामुळे ग्राहकांना आजवर कमी पेट्रोल मिळाल्याने झालेल्या नुकसानाबाबत वैधमापन विभाग, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे.