गडचिरोलीतील हत्ती स्थानांतरण प्रकरणात राधा-कृष्ण टेम्पल ट्रस्टचा हस्तक्षेप अर्ज
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: September 15, 2022 06:21 PM2022-09-15T18:21:11+5:302022-09-15T18:22:11+5:30
न्यायालयाने ट्रस्टचे म्हणणे लक्षात घेता अर्ज मंजूर केला व प्रकरणावर तीन आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.
नागपूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील पाळीव हत्ती स्थानांतरणसंदर्भातील प्रकरणामध्ये गुरुवारी गुजरात येथील राधा-कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने ट्रस्टचे म्हणणे लक्षात घेता अर्ज मंजूर केला व प्रकरणावर तीन आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ट्रस्टच्या वतीने गुजरातमधील जामनगर येथे ७०० हेक्टर परिसरात हत्ती संवर्धन प्रकल्प उभारला जात आहे. त्याकरिता देशभरातील पाळीव हत्ती या प्रकल्पात स्थानांतरित केले जात आहेत. आतापर्यंत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ९ हत्ती या प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आले आहेत. या स्थानांतरणाला विरोध होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. परिणामी, उर्वरित हत्ती स्थानांतरित करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.