मोबाईलच्या तरंगांमुळे रेडिओ दुर्बिणला धोका

By admin | Published: February 28, 2016 03:12 AM2016-02-28T03:12:13+5:302016-02-28T03:12:13+5:30

मोबाईल फोन नेटवर्कमध्ये तरंगांचे प्रमाण वाढविण्यात आले तर या तरंगांमुळे रेडिओ दुर्बिणीची कार्यक्षमताही प्रभावित होते.

Radio telescopic risk due to mobile waves | मोबाईलच्या तरंगांमुळे रेडिओ दुर्बिणला धोका

मोबाईलच्या तरंगांमुळे रेडिओ दुर्बिणला धोका

Next

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर : मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्काराने सन्मान
नागपूर : मोबाईल फोन नेटवर्कमध्ये तरंगांचे प्रमाण वाढविण्यात आले तर या तरंगांमुळे रेडिओ दुर्बिणीची कार्यक्षमताही प्रभावित होते. दुर्बिण व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांना अडचणी येतात. भारतात सध्या ही समस्या नसली तरी यावर वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात रेडिओ दुर्बिण खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे थेट परिणाम खगोलीय संशोधनावर होतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी येथे दिला.
वनराई फाऊंडेशन नागपूरतर्फे शनिवारी डॉ. नारळीकर यांना ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार २०१६’ने सन्मानित करण्यात आले. सत्कारानंतर ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. वर्धा रोडवरील नीरी सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा मुख्य अतिथी होते. माजी खासदार बनवारीलाल पुरोहित अध्यक्षस्थानी होते तर खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, नीरीचे ज्येष्ठ वैज्ञानिक पी. एस. दत्त, वनराई फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष अनंत घारड, कार्यकारी अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे व्यासपीठावर होते. डॉ. नारळीकर यांना विजय दर्डा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल, व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारे यांना प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. नारळीकर म्हणाले, रेडिओ दुर्बिणवर मोबाईल फोन नेटवर्कमुळे होणाऱ्या नुकसानीचा विषय हा केवळ आपल्या भारतापुरता मर्यादित नाही. तो जागतिक पातळीवरच आहे. रेडियो दुर्बिणच्या क्षेत्रात मोबाईल तरंगांचा व्यवसायिक वापर करता येत नाही. सध्या तरी यावर नियंत्रण आहे. परंतु भविष्यात मोबाईल कंपन्या याचा व्यावसायिक उपयोग करू शकतात. त्याकडे आताच लक्ष देण्याची गरज आहे. पुण्याजवळ अशीच एक रेडिओ दुर्बिण आहे. तिला वाचविण्याच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
शहरीकरणामुळे समस्या वाढत आहेत. अशा वेळी मोहन धारिया यांचा चेहरा समोर येतो. त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खूप प्रयत्न केलेत. धारिया यांच्याशी झालेल्या एका भेटीचा उल्लेख करताना ते म्हणाले, वृक्षांना वाचविण्यासाठी धारियाजींचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन आपणही अनेक वृक्ष वाचविले. ४० वडाची झाडे आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली. ती झाडे आजही जिवंत आहेत. पर्यावरण संरक्षण ही वेळेची मागणी आहे. खगोल आणि पर्यावरणाचा संबंध सुद्धा प्रगाढ असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात माजी खासदार बनवारीलाल पुरोहित म्हणाले, डॉ. नारळीकर यांनी आपले पूर्ण जीवन विज्ञान आणि देशसेवेच्या कामात लावले. आदर्श व त्यागाचे ते प्रतीक आहेत. भावी पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी. विज्ञानामुळेच आज क्रांतिकारी बदल दिसून येतात. नारळीकरांसारखे आणखी काही वैज्ञानिक तयार झाले तर भारत निश्चितच विश्वगुरू होईल. डॉ. नारळीकर यांचा सन्मान हा विदर्भवासीयांचा सन्मान आहे, असेही ते म्हणाले. दत्ता मेघे म्हणाले, विकासासाठी विज्ञानाची भूमिका महत्त्वाची असते.
डॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना धारिया यांच्या नावाने पुरस्कार देणे अभिनंदनीय आहे. खासदार अजय संचेती म्हणाले, डॉ. नारळीकर यांना आपण केवळ पुस्तकातच वाचत आलो आहोत. आज त्यांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित असणे, हीच गौरवाची बाब आहे. या कार्यक्रमाला वनराईचे गिरीश गांधी, अनिल राठी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, रमेश बोरकुटे, हरीश अड्याळकर प्रामुख्याने उपस्थित होते. नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांनी डॉ. नारळीकर यांचा परिचय करून दिला.
अनंत घारड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पिनाक दंदे यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. वनराईचे सचिव अजय पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

नारळीकरांचा सत्कार म्हणजे विदर्भवासीयांचा सत्कार
खासदार विजय दर्डा म्हणाले, देशाच्या तिरंग्याला संपूर्ण जगात सन्मान मिळवून देणारे डॉ. जयंत नारळीकर हे देशाचे लाडके सुपुत्र आहेत. त्यांचा सत्कार नागपुरात होणे हा संपूर्ण विदर्भवासीयांचा सत्कार आहे. आज असे दिसून येत आहे की, डॉ. नारळीकर आणि पुरस्कार या दोघांचाही सन्मान झाला. आपण अजूनही विज्ञानवादी दृष्टी अवलंबलेली नाही. त्यामुळेच आजही जागोजागी अंधश्रद्धा आणि बुवाबाजी दिसून येते. डॉ. नारळीकर यांनी अंधश्रद्धेला नेहमीच विरोध केला आहे. खासदार दर्डा म्हणाले, त्यांचे कार्य उत्कृष्ट असून समाजावर त्यांचे मोठे ऋण आहे. खगोलशास्त्रासारखा विषय त्यांनी अगदी सहज व सोप्या शब्दात घरोघरी पोहोचविला. मोहन धारिया यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासोबतच राष्ट्रनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने डॉ. नारळीकर यांना हा पुरस्कार देऊन पुरस्काराचाही सन्मान आहे. डॉ. नारळीकर यांच्याशी हात मिळवून आज मला जी ऊर्जा मिळाली ती अनुभूती जन्मभर कायम राहील, असेही त्यांनी सांगितले. खासदार दर्डा यांनी मराठवाड्यातील भीषण पाणीटंचाईचाही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, तलावातून पाणी आणताना दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही आजची परिस्थिती आहे. १२ हजार गावे प्रभावित आहेत. ४० लाख लोक घर सोडण्यास मजबूर आहेत. पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. विज्ञानासमोर अनेक प्रश्न आहेत. जलसंकटचा सामना कसा करावा, यासाठी वैज्ञानिकांनी प्रयत्न करावा, लोकांना जागरूक करावे लागेल.

Web Title: Radio telescopic risk due to mobile waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.