नागपुरातील चिंधी बाजार व्यावसायिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:53 AM2020-06-30T11:53:18+5:302020-06-30T11:55:00+5:30
शहरातील शेकडो विक्रेते मागील ५० वर्षांपासून घरोघरी जाऊन किंवा शनिवार बाजार, रेल्वे स्टेशन परिसर किंवा अन्य आठवडी बाजारात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांड्यांचा व्यवसाय करतात. मात्र लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून या विक्रेत्यांचे हाल होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमध्ये शहरातील बाजार बंद असल्याने जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडे विक्री करणाऱ्या शेकडो चिंधी बाजार व्यावसायिक संकटात सापडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करता शहरातील बाजार सुरू करावा अथवा त्यांच्या उपजीविकेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी शिष्टमंडळाने उपमहापौर मनीषा कोठे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
याप्रसंगी उपायुक्त निर्भय जैन यांच्यासह शिष्टमंडळातील उपसभापती नागेश सहारे, ज्ञानेश्वर तायवाडे, धृपती खरे, गीता सनेसर, आशा तायवाडे, वैशाली खंडारे, लता कावळे, रत्ना इंगळे आदी उपस्थित होते.
शहरातील शेकडो विक्रेते मागील ५० वर्षांपासून घरोघरी जाऊन किंवा शनिवार बाजार, रेल्वे स्टेशन परिसर किंवा अन्य आठवडी बाजारात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांड्यांचा व्यवसाय करतात. मात्र लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून या विक्रेत्यांचे हाल होत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला स्थानिक आमदार, नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींमार्फत मदत करण्यात आली. मात्र आता पुढील काळ उपासमारीचा आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मातंग समाजबांधव असून यंदा बॅण्ड पार्टी आणि रिक्षाचाही व्यवसाय हिरावला गेला आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन आठवडी बाजारात व्यवसायासाठी परवानगी द्यावी किंवा उपजीविकेसाठी अन्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात व्यावसायिकांना तातडीने जागा उपलब्ध करण्याचे निर्देश मनीषा कोठे यांनी दिले.