घरच्यांवरील रागात, शहरांच्या आकर्षणात लहान मुले घरून काढतात पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:09+5:302021-08-22T04:11:09+5:30

दयानंद पाईकराव नागपूर : अभ्यास कर म्हणून रागावले की बालकांना राग येतो. वेगवेगळ्या पद्धतीने ते आपला राग व्यक्त करतात. ...

In the rage at home, in the charm of the city, the little children run away from home | घरच्यांवरील रागात, शहरांच्या आकर्षणात लहान मुले घरून काढतात पळ

घरच्यांवरील रागात, शहरांच्या आकर्षणात लहान मुले घरून काढतात पळ

googlenewsNext

दयानंद पाईकराव

नागपूर : अभ्यास कर म्हणून रागावले की बालकांना राग येतो. वेगवेगळ्या पद्धतीने ते आपला राग व्यक्त करतात. मोबाईल घेऊन दिला नाही, मित्रांसोबत खेळू दिले नाही अशा कारणांमुळे अल्पवयीन मुले रागाच्या भरात घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. गेल्या दोन वर्षात अशी घर सोडून आलेली तब्बल ८१२ बालक रेल्वे चाईल्ड लाईनला आढळल्याची धक्कादायक माहिती आहे. रेल्वे चाईल्ड लाईनने या बालकांची आस्थेने चौकशी करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

वरदान संस्थेच्यावतीने संचालित रेल्वे चाईल्ड लाईन नागपूर ही बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने कार्यरत संस्था नागपूर रेल्वेस्थानकावर ३६५ दिवस २४ तास कार्यरत आहे. आतापर्यंत रेल्वे चाईल्ड लाईन नागपूरने २६०० बालकांना आपल्या सेवा दिल्या. यातील ९५ टक्के बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविले. परंतु पाच टक्के बालकांच्या आईवडिलांचा पत्ता न मिळाल्यामुळे या बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्या-त्या जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. सन २०१९ ते २०२१ या दोन वर्षाच्या कालावधीत नागपूर रेल्वेस्थानकावर एकूण ८१२ बालक मिळाले. यात महाराष्ट्रातील २४५ बालकांचा समावेश आहे. इतर बालकात मध्य प्रदेशातील १३१, छत्तीसगड ११३, उत्तर प्रदेश ८५, बिहार ६८, ओदिशा २९, राजस्थान २२, झारखंड २०, आंध्र प्रदेश १५, दिल्ली १५, पश्चिम बंगाल १९, तेलंगाणा १२, पंजाब ११, गुजरात १०, तामिळनाडु ४, आसाम २, हरियाणा ३, कर्नाटक ३, उत्तराखंड १, नेपाळ २ आणि अनोळखी ठिकाणावरून आलेल्या १४ बालकांचा समावेश आहे. अनेकदा रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, रेल्वे कर्मचारी, व्हेंडर, कुली हे सुद्धा पळून आलेले बालक दिसताच लगेच रेल्वे चाईल्ड लाईनकडे सुपूर्द करतात. तसेच १०९८ या हेल्पलाईनवरही माहिती मिळाल्यास पळून आलेल्या बालकांची सुटका करण्यात येते. वरदान संस्थेच्या अध्यक्षा, सचिव तसेच वरिष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे चाईल्ड लाईन टीमच्या समन्वयिका अंजली शेरेकर, प्रज्ञा घनमोडे, दीपाली ढमगये, रोशनी मेश्राम, सीमा गोडे, संयोगिता दुर्गे, खेमू रासेकर, विक्की डहारे, रणजित कुंभारे, नितेश सांगोळे, गोविंद देशमुख, कैलाश पुरकाम ही चमू २४ तास रेल्वेस्थानकावर घरून पळून येणाऱ्या बालकांच्या संरक्षणासाठी आपल्या सेवा देत आहे.

..............

मुलांना मुंबई, दिल्लीचे आकर्षण

- घरात मुंबई, दिल्ली अशा मेट्रोसिटीवर नेहमी चर्चा होत असते. लहान मुले ही चर्चा ऐकतात व त्यांना या शहरांचे आकर्षण वाटू लागते. त्यामुळे ‘घरातून निघून जाण्याचा विचार आला की ते आपल्या गावातील रेल्वेस्थानक गाठतात. घरातून आजवर निघून आलेल्या बालकांपैकी अनेकांनी मुंबई, दिल्ली तसेच पुण्याला जायचे असल्याचे सांगितले.

बालकांनी घर सोडण्याची ही आहेत कारणे...

- शहराविषयी आकर्षण वाटणे

- चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी

- वडिलांनी मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून

- अभ्यास कर म्हणून रागावल्याने

- अल्पवयात प्रेमात पडल्यामुळे

- मौजमजा करण्यासाठी शहरात जाण्यासाठी

- घरातील आर्थिक अडचणींमुळे

- वडील दारू पिऊन मारत असल्यामुळे

- आईवडील मित्रांसोबत खेळू देत नाहीत

---------------

चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी सोडले घर

- फेब्रुवारी २०२१ मध्ये नागपूरमधीलच १७ वर्षांच्या अवंतीने (बदललेले नाव) टीव्ही सीरियलमध्ये काम करण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी घर सोडले. मुंबईला जाण्यासाठी ती नागपूर रेल्वेस्थानकावर आली. त्यानंतर रेल्वे चाईल्ड लाइनची नजर तिच्यावर केली. लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या मदतीने या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

- गेम खेळू न दिल्यामुळे पलायन

नागपुरातील १२ वर्षांचा रोहन (बदललेले नाव) याला आईवडिलांनी मोबाइलवर गेम खेळू नको म्हटल्याने राग आला. डिसेंबर २०२० मध्ये त्याने शाळेत जातो असे सांगून त्याने थेट नागपूर रेल्वेस्थानक गाठले. तो कोणत्या तरी गाडीत बसून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे चाईल्ड लाइनच्या टीमने त्याला रोखले आणि आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने आईवडिलांच्या सुपुर्द केले.

...........

Web Title: In the rage at home, in the charm of the city, the little children run away from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.